भारताच्या भूमिकेचा रशियावर प्रभाव पडला आहे

- अमेरिकेच्या सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स

रशियावर प्रभाववॉशिंग्टन – भारताच्या पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर फोनवर केलेल्या चर्चेचे पडसाद अजूनही अमेरिकेत उमटत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर सावध प्रतिक्रिया नोंदविली होती. पंतप्रधान मोदी यांनी अण्वस्त्रांच्या वापरावरून व्यक्त केलेल्या चिंतेचा प्रभाव रशियावर पडल्याचा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला. बर्न्स यांनी भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. यामुळे युक्रेनचे युद्ध चिघळू नये, यासाठी भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनच्या युद्धाचे अणुयुद्धात पर्यावसन होऊ शकते, असे इशारे देत आहेत. विशेषतः अमेरिका व नाटोने युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याचा धडाका कायम ठेवला, तर रशिया आत्मसंरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करताना कचरणार नाही, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली होती. अमेरिकेने देखील आपल्या संरक्षणासाठी अण्वस्त्रांचा प्रथम वापर करण्याचे धोरण (प्रिएमटीव्ह स्ट्राईक) स्वीकारलेले आहे. याकडे लक्ष वेधून रशियालाही तसे करण्याचा अधिकार असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नुकताच केला होता.

युक्रेनच्या युद्धाची तीव्रता वाढत चाललेली असताना, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ही धमकी देऊन सर्वच देशांचा थरकाप उडविला. त्यातच रशिया युक्रेनचे युद्ध अधिकाधिक लांबवित असून इतक्यात हे युद्ध थांबविण्याचा रशियाचा इरादा नाही, असे आरोप आता युक्रेन व नाटो देखील करीत आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी युक्रेनसह पाश्चिमात्य आणि रशियावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेला देश म्हणून भारत हा संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

काही काळापूर्वी फ्रान्सने आपण भारताच्या साथीने युक्रेनचे युद्ध अधिक विध्वंसक बनू नये, यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला होता. मात्र रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अणुयुद्धाचे संकेत देऊन तशा हालचाली केल्याचे उघड झाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य अनेकपटींनी वाढले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी राजनैतिक वाटाघाटी हाच युक्रेनची समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग असल्याचा आग्रह धरला होता. मात्र यासंदर्भातील अधिक माहिती माध्यमांसमोर आली नव्हती.

त्या पार्श्वभूमीवर, सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी रशियाकडून दिल्या जात असलेल्या अणुहल्ल्याच्या धमक्यांचा उल्लेख केला. अजूनही रशिया अणुहल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे पुरावे आपल्याला आढळलेले नाहीत, असे म्हटले आहे. त्याचवेळी अणुहल्ल्याचे भयंकर परिणाम अमेरिकेने रशियाच्या लक्षात आणून दिले आहे. अशा काळात भारताच्या पंतप्रधानांनी अण्वस्त्रांच्या वापरावर चिंता व्यक्त करून हा मुद्दा उपस्थित केला. त्याचा प्रभाव रशियावर पडल्याचे दिसत आहे, असे विल्यम बर्न्स पुढे म्हणाले.

‘जी20’च्या बाली येथे पार पडलेल्या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी रशियाला दिलेल्या संदेशाचा समावेश करण्यात आला होता, त्याचाही विल्यम बर्न्स यांनी आपल्या मुलाखतीत उल्लेख केला आहे.

English हिंदी

leave a reply