तवांगच्या एलएसीवरील संघर्षानंतर दलाई लामा यांचा चीनबाबत महत्त्वपूर्ण संदेश

तवांगकांग्रा – युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील परिस्थिती बदलत असून चीन अधिक लवचिकता दाखवित आहे, असे सूचक उद्गार बौद्धधर्मियांचे गुरू व तिबेटी नेते आदरणीय दलाई लामा यांनी काढले आहेत. मात्र चीनमध्ये असे बदल होत असले, तरी आपण चीनमध्ये परतण्याची तयार नाही, भारत हेच आपले कायमस्वरूपी निवासस्थान आहे, इथेच रहायला आपल्याला आवडेल, असे दलाई लामा यांनी स्पष्ट केले.

तवांगच्या एलएसीवरील यांगत्से भागात भारतीय सैन्य व चीनच्या लष्करामध्ये संघर्ष झाल्यानंतर, पहिल्यांदाच दलाई लामा माध्यमांसमोर आले. 87 वर्षांच्या दलाई लामा यांनी युरोप, आफ्रिका व आशिया खंडात होत असलेल्या बदलांची नोंद घेऊन आत्ताच्या काळात चीन अधिक लवचिकता दाखवित असल्याचे विधान केले. तिबेटचा भूभाग बळकावून इथल्या जनतेवर चीनने अत्याचाराचे भीषण सत्र सुरू ठेवले होते. तिबेटमधील बौद्धधर्माची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, तिबेटी संस्कृती व भाषा यांचा संहार करण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने दडपशाहीचा वापर केला होता. मात्र त्यावेळी उभरती आर्थिक शक्ती असलेल्या चीनच्या या कारवायांकडे पाश्चिमात्य देशांनी दुर्लक्ष केले होते. पण आता चीनच्या विस्तारवादाची झळ या देशांनाही बसू लागल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

याचाच दाखला दलाई लामा आपल्या विधानातून देत असल्याचे संकेत मिळत आहेत. युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील देश चीनला उघडपणे विरोध करीत आहेत. छोट्या देशांना कर्जाच्या फासात अडकवून त्यांचे नैसर्गिक स्त्रोत बळकावणाऱ्या चीनच्या शिकारी अर्थनीतिला जगभरातून विरोध होऊ लागला आहे. चीनला विरोध करणाऱ्यांमध्ये युरोपिय देशांबरोबरच आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांचाही समावेश आहे. जगभरातून होत असलेल्या या विरोधामुळे चीनला आपल्या धोरणात निदान काही प्रमाणात बदल करणे आवश्यक वाटू लागले आहे. त्याचा अस्पष्टसा संदर्भ दलाई लामा यांच्या विधानातून मिळत असल्याचे दिसते.

चीन आपल्या धोरणांबाबत लवचिकता दाखवित असला तरी आपण चीनमध्ये परतणार नाही. आता भारत हेच आपले कायमस्वरूपी घर असल्याचे सांगून भारत आपल्यासाठी ‘परफेक्ट’ असल्याचा संदेश दलाई लामा यांनी दिला. दलाई लामा यांनी 1959 साली चीनने आक्रमण केल्यानंतर तिबेट सोडला व त्यांनी भारतात आश्रय घेतला. भारतात राहूनच दलाई लामा यांनी तिबेटवर चीन करीत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. अजूनही तिबेटींवरील चीनचे अत्याचार थांबलेले नाहीत. तिबेटी जनता चीनकडे स्वातंत्र्य नाही, तर स्वायत्तता मागत असल्याचे जाहीर केल्यानंतरही तिबेटी जनतेच्या हालअपेष्टांमध्ये बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत आपण चीनमध्ये परतणार नाही, असे सांगून दलाई लामा यांनी चीनची मुलभूत विचारसरणी बदलेली नाही, याची जाणीव करून दिली आहे. त्याचवेळी आपल्या या विधानांद्वारे दलाई लामा यांनी भारत व चीनमधील तफावत साऱ्या जगाला दाखवून दिली.

leave a reply