कराचीतील हल्ल्याचा आरोप भारतावर लावणाऱ्या पाकिस्तानला भारताने सुनावले

इस्लामाबाद/नवी दिल्ली – कराचीतील स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला भारताने जोरादार चपराक लगावली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अंतरराष्ट्रीय दहशतवाद्याचा उल्लेख शहीद असा करतात, अशा देशाने दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा दहशतवादाबाबतच्या आपल्या भूमिकेवर फेरविचार करावा, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले.

Karachi-Attack-Indiaसोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर बलोच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले होते. यानंतर काही वेळातच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी याचे खापर भारतावर फोडले होते. भारताने आपले स्लीपर सेल सक्रिय केले असून या हल्ल्यामागे भारताचे कारस्थान असल्याचा कांगावा कुरेशी यांनी केला होता. मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही संसदेत या हल्ल्यामागे भारतच असल्याचे आरोप लावले. मात्र त्याआधीच पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या आरोपांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार उत्तर देण्यात आले.

”पाकिस्तानचे आरोप हास्यस्पद आहेत. पाकिस्तान आपल्या अंतर्गत समस्यांचे खापर भारतावर फोडू पाहत आहे.”, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानने आधी दहशतवादाबाबतच्या स्वतःच्या भूमिकेवर विचार करण्याची गरज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान लादेन सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला शहीद म्हणतात, याकडे श्रीवास्तव यांनी लक्ष वेधले. तसेच जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा निषेध करताना भारत कचरत नाही. कराचीतला हल्लाही त्याला अपवाद नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत घुसताना बंडखोरांनी स्वतंत्र बलोचिस्तान आणि स्वतंत्र सिंधुदेशच्या घोषणा दिल्या होत्या. पाकिस्तानात स्वतंत्र बलोचिस्तान आणि स्वतंत्र सिंधुदेशाचे आंदोलन तीव्र झाले असून दोन आठवड्यांपूर्वी बालोचीस्तानात उग्र निदर्शने झाली होती आणि पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना आपली चौकी सॊडून पळ काढावा लागला होता. पाकिस्तानी लष्कराकडून बलोच जनतेवर सुरु असलेल्या अन्वयित अत्याचाराविरोधात बलोच जनता संतापली आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी बलोच नागरिक जगभरात निर्दशने करीत आहेत. पाकिस्तातूनच उठणारे हे स्वातंत्र्याचे आवाज अधिक तीव्र झाल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

leave a reply