भारत – श्रीलंकेच्या नौदलांचा ‘स्लिनेक्स -२०’ युद्धसराव सुरु

'स्लिनेक्स -२०’नवी दिल्ली – सोमवारपासून हिंदी महासागरात भारत आणि श्रीलंकन नौदलांमध्ये ‘स्लिनेक्स-२०’ नावाच्या संयुक्त युद्धसराव सुरु झाला. उभय देशांच्या नौदलांमधील आठवा द्विपक्षीय नौदल सराव आहे. श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे हा सराव पार पडत आहे. हिंदी महासागर क्षेत्रात श्रीलंका वर्चस्ववादी वृत्तीच्या विरोधात असल्याचे काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे म्हणाले होते. चीनचे नाव न घेता त्यांनी श्रीलंकेच्या धोरणातील बदलाचे संकेत दिले होते. यापार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील नौदल सहकार्य विस्तारताना दिसत आहेत.

'स्लिनेक्स -२०’

पाणबुडी विरोधी युद्धसाठी (एएसडब्ल्यू) तयार केलेली भारतीय विनाशिका आयएनएस कामोर्ता आणि आयएनएस किलतान या युद्धसरावात सहभागी झाल्या आहेत. याचबरोबर या सरावामध्ये हलक्या वजनाचे आधुनिक ध्रुव हेलिकॉप्टर, चेतक हेलिकॉप्टर, तसेच डोर्निअर मेरीटाइम पॅट्रोल विमानही नौदल सरावात सामील आहे. या युद्धसरावाचे नेतृत्व भारतीय नौदलातर्फे ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर रिअर ऍडमिरल संजय वत्सयन करत आहेत.

'स्लिनेक्स -२०’श्रीलंका नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ऍडमिरल बंडारा जयथीलाक यांच्या नेतृत्वाखाली एसएलएन शिप्स सयूरा ही ऑफशोर गस्तीनौका आणि गजबाहू ही प्रशिक्षण नौका श्रीलंका नौदलाचे प्रतिनिधित्व करत आहे. ‘स्लिनेक्स-२०’ युद्धअभ्यास भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापक सहकार्याचे उदाहरण आहे. त्यामुळे सागरी क्षेत्रात परस्पर समन्वय मजबूत झाले असल्याचे भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

चीनबरोबर तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागर क्षेत्रात महिन्याभरात पार पडलेला हा दुसरा युद्धसराव आहे. सप्टेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलामध्ये युद्धसराव पार पडला होता. यापूर्वी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये विशाखापट्टणममध्ये भारत आणि श्रीलंकन नौदलामध्ये ‘स्लिनेक्स’ सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

leave a reply