सीमेवरील व्यापारासाठी रुपयाच्या वापरावर दक्षिण आशियाई देशांशी भारताची चर्चा

- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास

दक्षिण आशियाईनवी दिल्ली – सीमेवरून होणाऱ्या व्यापारासाठी रुपयाचा वापर करण्यावर भारताची दक्षिण आशियाई देशांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. तर भूतान आणि नेपाळ हे देश भारताच्या ‘युपीआय’ची सुविधा अधिकप्रमाणात वापरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे. तर डिजिटल रुपयाचा (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी-सीबीडीसी) पायलट प्रोजेक्ट सुरू असून याकडे रिझर्व्ह बँक अत्यंत सावधानतेने पाहत आहे, पण पुढच्या काळात दक्षिण आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापारासाठी डिजिटल रुपयाचाही वापर होऊ शकतो, असा विश्वास शक्तिकांता दास यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शक्तिकांता दास बोलत होते. भारत व बांगलादेश आघाडीवर असलेल्या दक्षिण आशियाई क्षेत्राचा जागतिक आर्थिक विकासातील हिस्सा 15 टक्के इतका आहे, याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत कोरोनाची साथ, महागाई, वित्तीय बाजारपेठेसमोरील संकट आणि रशिया-युक्रेनचे युद्ध यामुळे दक्षिण आशियाई देशांसमोर फार मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत. अर्थव्यवस्थांना बसत असलेल्या या धक्क्यांना तोंड देण्यासाठी दरवाढ कमी करणे, विश्वसार्ह वित्तीय धोरणे स्वीकारण्याबरोबरच पुरवठ्याच्या आघाडीवर योग्य ठिकाणी हस्तक्षेप व वित्तीय, व्यापारी आणि प्रशासकीय पातळीवर योग्य ती पावले उचलणे महत्त्वाचे ठरते, असा दावा शक्तिकांता दास यांनी केला.

दक्षिण आशियाई देशांसमोर ही आव्हाने खडी ठाकलेली असताना, भारताबरोबरील या देशांच्या व्यापाराचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, याची जाणीव शक्तिकांता दास यांनी करून दिल्याचे दिसत आहे. दक्षिण आशियातील शेजारी देशांबरोबर सीमेवरून होणाऱ्या व्यापारासाठी रुपयाचा वापर करण्यावर भारताची चर्चा सुरू असल्याचे सांगून दास यांनी यासाठी सुरू असलेले प्र्रयत्न अधोरेखित केले आहेत. काही देशांनी यासाठी तयारी दाखविल्याचे उघड होत आहे. याआधी भारताने रशियाबरोबर रुपया-रुबलमध्ये व्यवहार करण्याची तयारी केलेली आहे. इतकेच नाही तर श्रीलंका देखील भारताच्या रुपयांमध्ये रशियाबरोबर इंधन करण्यावर चर्चा करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर बांगलादेशने देखील भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्याबाबत अनुकूल भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. युएई व सौदी अरेबिया या आखाती देशांनी देखील रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकन डॉलरचे स्थान धोक्यात आले आहे. अमेरिका आपल्या डॉलरचा राजकीय हत्यारासारखा वापर करीत असून युक्रेनच्या युद्धानंतर रशियावर अमेरिकेने लादलेले निर्बंध आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरचे स्थान धोक्यात टाकत असल्याचे अर्थतज्ज्ञांनी बजावले होते. अमेरिकेच्या डॉलवरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी रशियाने आपल्या रुबल व इतर देशांच्या चलनांमध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली असून याला उत्तम प्र्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेच्या या बेताल धोरणांमुळे सावध झालेले इतर देश देखील आपल्या चलनाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात अधिकाधिक वापर करण्यासाठी पावले टाकत आहेत. अशा काळात भारत आंतरराष्ट्रीय चलन म्हणून रुपयाचा वापर करण्याची तयारी करीत आहे, ही लक्षवेधी बाब ठरते. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर, जगातील जवळपास सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत. पण अशा काळात भारतीय अर्थव्यवस्था आश्वासक दराने प्रगती करीत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतावर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. यामुळे भारताची विश्वासार्हता अधिकच वाढली असून रुपयाचा वापर सुरक्षित ठरेल, याची खात्री इतर देशांना पटू लागली आहे.

या साऱ्या घटकांमुळे कित्येक देश भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी तयारी दाखवित असून यासाठी रिझर्व्ह बँकेने देखील आपल्या धोरणात आवश्यक ते बदल केल्याचे दिसत आहे. भारत व दक्षिण आशियाई देशांमध्ये सीमेवरून होणाऱ्या व्यापारासाठी रुपयाचा वापर सुरू झाला, तर त्यातून जगाला फार मोठा सकारात्मक संदेश मिळू शकेल.

leave a reply