इस्रायलच्या पंतप्रधानांचा अमेरिका व युरोपिय देशांना इशारा

- इस्रायलचे धोरण बदलत असल्याचे बजावले

अमेरिका व युरोपियजेरूसलेम/मॉस्को/वॉशिंग्टन – यापुढे इस्रायलचा आवाज जगात ऐकला जाईल. पुढच्या काळात जगाकडून दिल्या जात असलेल्या सूचनांचे इस्रायल पालन करणार नाही. त्यापेक्षा इस्रायल आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करील, अशा खणखणीत शब्दात पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ही घोषणा करण्याच्या काही तास आधी, नवे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याद्वारे इस्रायलचे नवे सरकार आपल्यावर दबाव टाकू पाहणाऱ्या अमेरिका व युरोपिय देशांना इशारा देत असल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या सत्तेवर आलेले बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार रशिया-युक्रेन युद्धाबाबत कोणती भूमिका स्वीकारते, याकडे पाश्चिमात्य मित्रदेश लक्ष लागलेले होते. इस्रायलचे माजी पंतप्रधान येर लॅपिड यांनी गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षासाठी रशियावर टीका करून युक्रेनची बाजू उचलून धरली होती. त्याचबरोबर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन किंवा परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी इस्रायल चर्चा करणार नसल्याची घोषणा लॅपिड यांनी केली होती. तर इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी युक्रेनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता.

अमेरिका व युरोपिययामुळे इस्रायल व रशियामध्ये तणाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत लॅपिड यांच्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानपदावर आलेले बेंजामिन नेत्यान्याहू देखील अमेरिका व युरोपिय देशांच्या रशियाविरोधी भूमिकेचे समर्थन करतील का, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय माध्यमे विचारत होती. इस्रायलचे नवे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. याद्वारे इस्रायलच्या नव्या सरकारने आपले धोरण स्पष्ट केल्याचे दिसत आहे.

रशिया-युक्रेनच्या मुद्यावर इस्रायल जाहीरपणे कोणतीही घोषणा करणार नाही, याबाबत कमी बोलणार असल्याचे इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर या संघर्षाबाबत वेगळे धोरण स्वीकारुन त्याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचेही परराष्ट्रमंत्री कोहेन पुढे म्हणाले. मात्र युक्रेनला मानवतावादी सहाय्य यापुढेही पुरविवले जाईल, अशी माहिती इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. तसेच रशियातील ज्यूधर्मियांच्या सुरक्षेवरही कोहेन-लॅव्हरोव्ह यांच्यात चर्चा पार पडल्याची माहिती समोर येत आहे.

नेत्यान्याहू सरकारची ही भूमिका इस्रायलला सिरियातील दहशतवादविरोधी कारवाईत रशियाचे सहाय्य मिळवून देणारी ठरेल, असा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत. पण कोहेन-लॅव्हरोव्ह यांच्यातील चर्चेवर अमेरिका तसेच युक्रेनमधून पडसाद उमटले आहेत. ‘रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीवर कमी बोलण्याची इस्रायलची भूमिका व्यथित करणारी आहे’, अशी टीका अमेरिकन काँग्रेसमधील वरिष्ठ सिनेटर व इस्रायल समर्थक लिंडसे ग्रॅहम यांनी केली. तर इस्रायलने या संघर्षात योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येणाऱ्या सूचनांसमोर झुकण्याएवजी इस्रायल आपल्या हिताचे रक्षण करील’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. इस्रायलचे परराष्ट्र धोरण बदलत आहे, असे सांगून नेत्यान्याहू यांनी अमेरिका व युरोपिय देशांच्या मागण्यांसमोर झुकणार नसल्याचे ठणकावले. दरम्यान, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कोहेन लवकरच रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांची भेट घेणार आहेत. इस्रायलच्या भूमिकेतील हा बदल अमेरिकेला नाराज करणारा आहे. त्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटू लागल्याचे दिसत आहे.

leave a reply