दहशतवादी पाकिस्तान हीच सार्कचे सहकार्य रोखणारी प्रमुख समस्या

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा ठपका

सार्कचे सहकार्यवाराणसी – सार्क परिषदेला चालना देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली होती. भारतामुळे सार्कचे सहकार्य बाधित झालेले आहे, अशी टीका देखील पंतप्रधान शरीफ यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. शेजारी देशांशी व्यवहार करताना, दहशतवादाचा वापर करण्यात काहीच गैर नाही, असे मानणाऱ्या एका देशामुळे सार्क संघटन सक्रीय राहिलेले नाही, असा टोला जयशंकर यांनी लगावला. त्याचवेळी दहशतवादाचा उघडपणे पुरस्कार करणाऱ्या देशाबरोबर भारत क्रिकेट खेळणार नाही, तसे करून भारत दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशावरील दडपणातून मुक्त करणार नाही, असा सज्जड इशारा देखील परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून या देशाच्या परकीय गंगाजळीत आता सात अब्ज डॉलर्सहून कमी रक्कम उरलेली आहे. कराची बंदरावर उतरलेल्या भाजीपाला व इतर आवश्यक गोष्टींचे बिल चुकते करण्याइतकेही पैसे पाकिस्तानकडे नाहीत. यामुळे कराची बंदरावरील 400 कंटेनर्समधला भाजीपाला सडून चालला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान सार्कच्या सहकार्याला चालना देण्याच्या वल्गना करीत आहेत. तसेच भारतामुळे हे सहकार्य पुढे सरकत नसल्याची टीका करून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या पोकळ दाव्यांवर भारतीय विश्लेषकांनी सडकून टीका केली आहे. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानच्या दहशतवादामुळेच सार्कचे सहकार्य खंडीत झाल्याची बाब लक्षात आणून दिली.

थेट नामोल्लेख टाळून जयशंकर यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर घणाघाती प्रहार केले. शेजारी देशांशी व्यवहार करताना दहशतवादाचा वापर करण्यात काहीही चुकीचे नाही, असे मानणाऱ्या एका देशामुळेच सार्कचे सहकार्य खंडीत झाले. मात्र सार्कचे सदस्य असलेल्या बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका या देशांबरोबरील गेल्या पाच वर्षातील भारताचे सहकार्य अधिकाधिक भक्कम बनत चालले आहे. इतकेच नाही तर, या देशांबरोबरील व्यापार, गुंतवणूक आणि इतर आघाड्यांवरील भारताचे सहकार्य व्यापक होत आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. पण दहशतवाद आणि अमली पदार्थांची तस्करी करणारा पाकिस्तान हीच सार्कची प्रमुख समस्या आहे, ही बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिली.

असे असले तरी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर अधिक प्रभावीपणे मांडण्यात भारताला फार मोठे यश मिळाल्याची जाणीव यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. आधीच्या काळात जग भारत आणि पाकिस्तानकडे एकाच दृष्टीने पाहत होते. पण आता तसे घडत नाही. आत्ताचा भारत क्षेत्रिय आघाडीवर अधिक प्रभावी भूमिका पार पाडत असून महत्त्वाची शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले. दरम्यान, एका वृत्तवाहिनीवर पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार नाही, असे ठणकावले. पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या एशिया कप स्पर्धेत भारताने सहभाग घेतला नाही, तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणार नसल्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. पण अशा स्पर्धा होतच असतात, त्यावर भारत आपले धोरण ठरवत नाही, अशा थेट शब्दात जयशंकर यांनी भारताचे धोरण बदलणार नसल्याचे बजावले.दहशतवादाचा वापर करणारा देश तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवून चर्चेची मागणी करीत असेल, तर तुम्ही त्यासाठी तयारी दाखवाल का? असा प्रश्न परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशावर दडपण अधिकाधिक प्रमाणात वाढविणे हे या देशाच्या दहशतवादाचे शिकार ठरलेल्या देशाचे कर्तव्यच ठरते. त्यात कसूर करून चालणार नाही. उलट भारताने दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मोहीमेचे नेतृत्त्व करायला हवे. त्याखेरीज दहशतवादाच्या पुरस्कर्त्या देशांवर दडपण येणार नाही, ही बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. यामुळे पाकिस्तानने कितीही धमक्या दिल्या तरी त्याचा भारताच्या धोरणांवर परिणाम होणार नसल्याचा सुस्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे.

वाराणसी येथे पार पडलेल्या एका सभेत व एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानबाबतची भारताची भूमिका नेमक्या शब्दात मांडली. भारत व पाकिस्तानमध्ये क्रिकेट सुरू झाले तर दोन्ही देशांचे संबंध सुधारतील, असा दावा पाकिस्तानातून सातत्याने केला जात आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू यासाठी भारताला सातत्याने आवाहन करीत असून आपली मागणी मान्य करण्याचे औदार्य भारत दाखवित नसल्याची तक्रार करीत आहेत. मात्र भारताकडे क्रिकेटसाठी याचना करणारा पाकिस्तान व्यापार तसेच अन्य आघाड्यांवर भारताशी सहकार्य करायला तयार नाही. त्यामुळे केवळ क्रिकेट खेळण्याची मागणी करून आपल्याला भारताबरोबर उत्तम संबंध हवे असल्याचे पाकिस्तानकडून केले जाणारे दावे म्हणजे या देशाचे ढोंग असल्याचे दिसत आहे. भारतीय विश्लेषकांनी वेळोवेळी याची जाणीव करून दिली होती.

leave a reply