सायबर व अवकाश क्षेत्रातील चीनच्या प्रगतीपासून भारताला धोका

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

बंगळुरू – कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय संक्षणदलांचे एकीकरण घडविण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. तर ‘सायबर आणि अवकाश क्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीपासून भारताला फार मोठा धोका संभवतो. हा धोका लष्करी आव्हानांच्या पलिकडे जाणार असून या धोक्याच्या कचाट्यात धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील असलेले राष्ट्रीय प्रकल्पही येऊ शकतात’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बजावले आहे.

सायबर व अवकाश क्षेत्रातील चीनच्या प्रगतीपासून भारताला धोका - संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावतकर्नाटकातील वायुसेनेच्या येलाहंका हवाई तळावर १९७१ सालच्या बांगलादेश युद्धात मिळविलेल्या ‘स्वर्णिम विजयवर्ष’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी संरक्षणदलांची क्षमता व सामर्थ्य वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. यानुसार संरक्षणदलांसाठी स्वदेशी बनावटीची शस्त्रे व संरक्षणसाहित्य, क्षमता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तसेच प्रशिक्षण आणि आवश्यक पुरवठ्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. समोर येणार्‍या कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी संरक्षणदलांनी सज्ज असावे, या दिशेने केंद्र सरकार याबाबतचे निर्णय जलदगतीने घेत आहे, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी देशासमोर खड्या ठाकलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांची परखड शब्दात जाणीव करून दिली. गेल्या वर्षी एलएसीवर चीनच्या लष्कराच्या भारतविरोधी कारवाया हाणून पाडण्यात भारतीय सैन्याला यश मिळत आहे. गेल्या वर्षी गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षावरही भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पण देशाच्या सुरक्षेला मिळणार्‍या आव्हानांचे स्वरुप अतिशय जटील व गुंतागुंतीचे आहे, यात अनेक गोष्टींचा समावेश आहे, असे जनरल रावत यांनी बजावले.

‘सायबर आणि अवकाश क्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीपासून भारताला फार मोठा धोका संभवतो. अशा पारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांच्या पलिकडे जाणार्‍या धोक्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, असे जनरल रावत पुढे म्हणाले. न सुटलेले सीमावाद, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढत असलेले महत्त्व कमी करणे आणि तीव्र स्पर्धा, यामुळे चीन भारताच्या विरोधात हालचाली करू शकतो, असे संकेत यावेळी संरक्षणदलप्रमुखांनी दिले. चीनकडून धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते, याची जाणीव संरक्षणदलप्रमुखांनी करून दिली. गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर तणाव निर्माण झाल्यानंतर, भारतावर होणार्‍या सायबर हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. राष्ट्रीय यंत्रणांनी याबाबतचे इशारे दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणदलप्रमुखांनी याबाबत देशाला सावध केल्याचे दिसत आहे.

भारताच्या विरोधात पाकिस्तानने पुकारलेले दहशतवादी युद्ध अजूनही थांबलेले नाही. तसेच भारताच्या विरोधातील विषारी अपप्रचारही पाकिस्तानने रोखलेला नाही, असे सांगून जनरल रावत यांनी याचा धोकाही वाढल्याचे म्हटले आहे. भारत व पाकिस्तानमधील अविश्‍वासाची दरी अधिकाधिक रुंदावत चालली असून आता ही दरी बुजविता येणे शक्य नाही, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे.

२०३५ सालापर्यंत चीनला आपल्या लष्कराचे पूर्णपणे आधुनिकीकरण करायचे आहे. तर २०४९ सालापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे लष्कर उभारणे हे चीनसमोरील ध्येय आहे, असे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या संरक्षणसचिव अजय कुमार यांनी बजावले. चीनच्या महत्त्वाकांक्षा व हालचाली यांची भारत गंभीरपणे दखल घेत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

leave a reply