भारत अमेरिकेकडून ‘एमक्यू-9बी ड्रोन’ खरेदी करणार

नवी दिल्ली – भारत अमेरिकेकडून सुमारे 30 ‘एमक्यू-9बी प्रिडेटर आर्म्ड ड्रोन्स’ खरेदी करण्याच्या तयारीत आहे. तीन अब्ज डॉलर्सच्या या व्यवहारावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हा व्यवहार ‘गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट’ अर्थात दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये होणार असल्याची माहिती दिली जाते. काही आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानात अल कायदाचा प्रमुख जवाहिरी याचा बळी घेण्यासाठी अमेरिकेने ज्या ‘एमक्यू-9’ ड्रोनचा वापर केला होता. त्याचेच व्हेरिअंट असलेल्या ‘एमक्यू-9बी प्रिडेटर ड्रोन’ची खरेदी करून त्याचा लष्कर, वायुसेना आणि नौदलासाठी वापर करण्याची तयारी भारताने केली आहे. विशेषतः चीनलगतच्या ‘एलएसी’ व ‘सागरी क्षेत्रात या ड्रोन्सची तैनाती अतिशय महत्त्वाची ठरेल.

MQ-9B-dronesअमेरिकेच्या ‘जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कार्पोरेशन’कडून ‘एमक्यू-9बी’ ड्रोन्स तयार केले जातात. भारत गेल्या काही वर्षांपासून या ड्रोन्सच्या खरेदीसाठी प्रयत्न करीत आहे. 2020 साली भारताने जनरल ॲटोमिक्सकडून दोन एमक्यू-9बी ड्रोन्स भाडेतत्त्वावर घेतले होते. हिंदी महासागर क्षेत्रात याचा भारतीय नौदलाकडून वापर करण्यात आला. गेल्या सहा महिन्यात या ड्रोन्सने भारतीय सागरी क्षेत्र तसेच भूभागावरून सुमारे तीन हजार तास इतके उड्डाण केलेले आहे, अशी माहिती जनरल ॲटोमिक्सचे वरिष्ठ अधिकारी विवेक लाल यांनी दिली.

भारत व अमेरिकेमध्ये हे ड्रोन्स खरेदी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये सुरू असलेली ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पण याबाबतचे तपशील दोन्ही देशांकडूनच उघड केले जातील. मात्र कंपनीच्या पातळीवर बोलायचे झाले तर आमच्या भारतीय ग्राहकांना एमक्यू-9बी ड्रोन्स पुरविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी माहिती विवेक लाल यांनी दिली. दरम्यान, अतिशय उंचावरून उड्डाण करूनही भूभाग तसेच सागरी क्षेत्रातील हालचाली सहजपणे टिपणाऱ्या, तसेच शत्रूचा वेध घेऊन अचूकतेने मारा करणाऱ्या या अत्याधुनिक ड्रोन्सचा भारतीय संरक्षणदलांमधील सहभाग खूपच महत्त्वाचा ठरतो. भारत व अमेरिकेमध्ये यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर पाकिस्तानने आक्षेप घेऊन अमेरिकेने भारताला हे ड्रोन्स पुरवू नये, अशी मागणी केली होती.

सदर ड्रोन्सची तैनाती हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या युद्धनौकांवर तसेच चीनलगतच्या एलएसीवर करण्यात येणार आहे. सध्या भारत व चीनमध्ये लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, एमक्यू-9बी ड्रोन्सची इथली तैनाती निर्णायक बाब ठरू शकते. याने भारतीय लष्कर तसेच वायुसेनेची टेहळणी तसेच मारकक्षमताही प्रचंड प्रमाणात वाढेल. मुख्य म्हणजे शत्रूवर अचूक मारा करण्यासाठी वायुसेना किंवा लष्कराला या ड्रोन्समुळे कुठल्याही स्वरुपाच्या जीवितहानीची जोखीम पत्करावी लागणार नाही.

रशिया व युक्रेनमधील युद्धापासून भारतीय संरक्षणदलांनी फार मोठा धडा घेतल्याचा दावा संरक्षणदलांचे प्रमुख करीत आहेत. त्याचवेळी तसेच त्याआधीच्या काळात सौदी व येमेनी बंडखोरांमध्ये 2015 साली सुरू झालेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. आत्ताच्या काळात संघर्ष बऱ्याच काळासाठी सुरू राहतात आणि त्यात गुंतलेल्या देशांची शक्ती क्षीण होत राहते. हे लक्षात घेऊन सुरू झालेला संघर्ष संपविण्यासाठी मारकक्षमता वाढविण्याखेरीज पर्याय नाही आणि त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा वापर करणे अनिवार्य आहे, असे संरक्षणदलातून निवृत्त झालेले माजी अधिकारी सांगत आहेत. सामरिक विश्लेषक देखील तसा सल्ला देत आहेत. त्यामुळे सीमेची सुरक्षा, दुर्गभ भागातील टेहळणी तसेच शत्रूच्या हालचालींचा वेध घेऊन वेळीच त्यांच्यावर हल्ला चढविण्याची क्षमता विकसित करणे भारतासारख्या देशासाठी महत्त्वाचे ठरते.

याबरोबरच ‘एमक्यू-9बी प्रिडेटर ड्रोन’च्या खरेदीमुळे भारत व अमेरिकेमधील संरक्षणविषयक तसेच सामरिक सहकार्य अधिकच दृढ होईल. भारताने रशियाकडून एस-400 ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेला सदर ड्रोन्सचे कंत्राट मिळणे भारताच्या व्यापक हितसंबंधांसाठी आवश्यक बाब ठरेत. काही दिवसापूंर्वीच अमेरिकेच्या संसदेत एस-400 च्या रशियाबरोबरील खरेदी व्यवहारावरून भारतावर निर्बंध न टाकण्याच्या विधेयकाला संमती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘एमक्यू-9बी प्रिडेटर ड्रोन’बाबतचा हा करार दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक पुढे नेणारा ठरू शकेल.

leave a reply