तुर्कीने सिरियात चढविलेल्या हल्ल्यात 21 जणांचा बळी

दमास्कस – तुर्कीच्या लष्कराने सिरियाच्या कुर्दांचे प्राबल्य भागात चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये 21 जणांचा बळी गेला. यामध्ये नागरिकांचा मोठा समावेश असल्याचा दावा कुर्द संघटना करीत आहेत. तर आपल्या लष्कराने सिरियातील कुर्द दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. दरम्यान, सिरियातील या संघर्षात अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

turkey-syria-attackसिरियाच्या ‘देर अल-झोर’ या प्रांतातील अल-बाब भागात शुक्रवारी रात्री जोरदार रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यात 21 जणांचा बळी गेला तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये चार अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी तुर्कीने ड्रोन्सचा वापर केल्याचा दावा केला जातो. तर अलेप्पोतील तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांनी या कारवाईसाठी तुर्कीच्या लष्कराला सहाय्य केल्याचा आरोप कुर्द संघटना तसेच ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटना करीत आहेत.

तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘वायपीजी’ आणि ‘पीकेके’च्या कुर्द दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. कुर्द दहशतवादी तुर्कीच्या ‘ऑपरेशन युफ्रेटस शिल्ड’ मोहिमेला लक्ष्य करणार होते. त्याच्या आधीच या दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. दरम्यान, सिरियातील अस्साद सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याची घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. याच्या आधी हा हल्ला चढवून तुर्कीने आपण सिरियातील कुर्द संघटनांवरील थांबविणार नाही, असा संदेश दिला आहे.

सिरिया, इराक, इराण व तुर्कीमध्ये कुर्दवंशिय विभागले गेले आहेत. या देशांमध्ये कुर्दवंशियांचे अधिकार सातत्याने डावलण्यात आले होते. तसेच इराक व सिरिया तसेच तुर्कीतही कुर्दवंशियांवर सातत्याने अन्याय करण्यात आल्याचा दावा करून या देशांमधील कुर्द संघटनांनी स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी केली होती. इराकमधील कुर्दवंशियांना संख्याबळाच्या जोरावर स्वायत्त प्रांत मिळाला आहे. तर सिरियातील कुर्दवंशिय संघटना शस्त्रे हाती घेऊन कधी अस्साद राजवट तर कधी आयएस सारख्या दहशतवादी संघटनेशी संघर्ष करीत आहेत. सिरियातील कुर्दांच्या संघटना सीमेच्या सुरक्षेसाठी घातक बनल्याचा ठपका ठेवून तुर्कीने ‘वायपीजी’ आणि ‘पीकेके’ यांना दहशतवादी घोषित केले होते. तसेच आवश्यकता भासल्यास सिरियाची सीमा ओलांडून या संघटनांवर कारवाई करण्याचा अधिकार आपल्या देशाला असल्याचे दावे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन करीत आहेत.

आखातातील काही देश आयएसपासून असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या विरोधात लढणाऱ्या कुर्द संघटनांबाबत सहानुभूती बाळगून आहेत. अमेरिकेनेही सिरियातील आयएसविरोधातील लढ्यात कुर्द संघटनांच्या मागे उभे राहण्याचे संकेत दिले होते. या मुद्यावर तुर्कीचे अमेरिकेशी गंभीर मतभेद निर्माण झाले होते. सध्याच्या काळात तुर्कीची अर्थव्यवस्था घसरलेली असताना, अमेरिका व पश्चिमात्य देशांसह अरब-आखाती देश आणि इस्रायलशीही जुळवून घेण्यासाठी तुर्कीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र सिरियातील कुर्दांबाबतची आपली कठोर भूमिका सौम्य होणार नाही, हे तुर्की सातत्याने दाखवून देत आहे.

leave a reply