भारताकडे कुठल्याही बाह्य व अंतर्गत आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

केवडिया – ‘सरदार वल्लभभाई पटेल यांना सामर्थ्यशाली, सामावेशक, संवेदनशील आणि सावध, विनयशील आणि विकसित भारत अपेक्षित होता. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश सरदार पटेलांनी दिला. यापासून प्रेरणा घेऊन आजचा भारत कुठल्याही बाह्य आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यासाठी समर्थ बनलेला आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी साजर्‍या केल्या जाणार्‍या ‘राष्ट्रीय एकदा दिवस’साठी दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी देशाचे सर्वच आघाड्यांवरील सामर्थ्य व क्षमता वाढल्याचे सांगून त्यावर समाधान व्यक्त केले.

भारताकडे कुठल्याही बाह्य व अंतर्गत आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान नरेंद्र मोदीकोरोनाच्या संकटात संघटीत प्रयत्नांद्वारे भारतीयांनी या आव्हानाचा सामना केला. असे संघटीत प्रयत्न देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील, असे सांगून सरदार पटेल यांनीही एकसंघतेचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले होते, याची आठवण करून दिली. ‘जम्मू व काश्मीर असो ईशान्येकडील राज्ये असो किंवा हिमालयातील कुठलाही गाव असो, आजच्या काळात सारेजण विकासाच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. गेल्या सात वर्षाच्या काळात देशातील जुनाट कायदे रद्द करण्यात आले आहे. त्याचवेळी देशाची एकता नव्या उंचीवर नेण्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली जात आहे. पायाभूत सुविधांचे आधुनिक विकासप्रकल्प देशातील भौगोलिक व सांस्कृतिक अंतर कमी करी आहेत’, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

‘आजच्या काळात देशात सामाजिक व आर्थिक घटनात्मक अखंडतेचा महायज्ञ सुरू आहे. भू, जल, वायू आणि अवकाश क्षेत्रातील भारताची क्षमता व निर्धार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी देशाने आत्मनिर्भरतेची कास धरली आहे. देशाला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनविणे ही प्रत्येकजण करीत असलेल्या प्रयत्नांमागची प्रेरणा असली पाहिजे’, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

दरम्यान, मागच्या काही आठवड्यांपासून राजकीय नेतृत्त्व व संरक्षणदलांचे अधिकारी देशाच्या संरक्षणविषयक सामर्थ्यावर वारंवार विश्‍वास व्यक्त करीत आहेत. भारत शांतीप्रिय देश आहे, पण चिथावणी मिळाल्यास भारत कुठल्याही आव्हानांचा सामना करील, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच म्हटले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आवश्यकता भासल्यास भारत पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करील, असे बजावले आहे. अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताने आपल्या क्षमतेचा सार्‍या जगाला परिचय करून दिला होता. या सार्‍या गोष्टी भारताच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या चीन तसेच पाकिस्तानसारख्या देशांना इशारा देण्यासाठीच असल्याचे समोर येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यांचे नवे सत्र सुरू केले आहे. तर चीनने एलएसीजवळील क्षेत्रात आक्रमक लष्करी कारवाया सुरू करून भारतावर दडपण टाकण्याचा डाव आखला आहे. दोन्ही शेजारी देशांच्या या कारवाया भारताच्या सुरक्षेसमोर खडी ठाकलेली नवी आव्हाने उभी करीत असून अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानसह चीनला एकाच वेळी खरमरीत इशारे देत आहे. भारताने अग्नी-५ची चाचणी करून चीनसाठी ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. सारा चीन भारताच्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याने चीनला भारतविरोधी कारवाया करताना, भारताकडे असलेल्या या क्षमतेचे भान ठेवावे लागेल, असे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून ‘जी२०’ परिषदेसाठी युरोपच्या दौर्‍यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात भारताचे सामर्थ्य अधोरेखित केले. यापुढे भारत कुठलीही आगळीक खपवून घेणार नाही, हे याद्वारे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा स्पष्ट केल्याचे दिसते आहे.

leave a reply