भारत-ब्रिटन अतिप्रगत लढाऊ विमानांचे इंजिन विकसित करणार

नवी दिल्ली – भारत आणि ब्रिटनमधील संरक्षण सहकार्य नवी उंची गाठत असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरातील आघाडीचे देश भारताला अतिप्रगत लढाऊ विमाने पुरविण्याच्या शर्यतीत उतरलेले असताना ब्रिटनने भारताला सदर लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी लढाऊ विमानांच्या इंजिनचे तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच उभय देशांमध्ये जेट इंजिन तंत्रज्ञान विकासावर करार अपेक्षित आहे. याआधीच उभय देशांमधील ‘डिफेन्स लॉजिस्टिक्स’ करार अंतिम टप्प्यात असून संरक्षण प्रशिक्षण सामंजस्य करार देखील प्रगतीपथावर आहे.

२०१८ साली आयोजित करण्यात आलेल्या ‘एरो इंडिया’मध्ये ब्रिटनने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत भारताला महत्त्वाचा प्रस्ताव दिला होता. ‘सिक्स्थ जनरेशन’ अर्थात सहाव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी संयुक्तरित्या तंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी ब्रिटनने भारताला ऑफर दिली होती. गेल्या काही वर्षांपासून भारत विकसित करीत असलेल्या ‘अॅडव्हान्सड्‍ मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) या पाचव्या पिढीतील अतिप्रगत विमानाच्या इंजिनसाठी सदर तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो.

‘एएमसीए’ विमानाच्या निर्मितीआधी भारताने रशियाबरोबर पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या निर्मितीसंबंधी प्रदीर्घ चर्चा केली होती. सिंगल सीट, डबल इंजिन आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या अतिप्रगत विमानावरील संशोधन आणि चाचणीसाठी भारत सरकारने कोट्यवधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणाही केली होती. पण काही कारणास्तव सदर सहकार्य मागे पडल्यामुळे भारताने या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेण्याचे संकेत दिले होते. आता ब्रिटनने भारताला पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी सहाव्या पिढीतील तंत्रज्ञान पुरविण्याची तसेच यावर एकत्र काम करण्याची तयारी व्यक्त केली आहे.

येत्या काही दिवसात भारत आणि ब्रिटनमध्ये ‘डिफेन्स लॉजिस्टिक्स’ करार होणार असल्याची माहितीही समोर येत आहे. अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि जपाननंतर भारताबरोबर सदर करार करणारा सातवा देश ठरणार आहे. यामुळे भारताला ब्रिटनच्या जिबौती येथील लष्करी तळाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे सदर सहकार्याकडे देखील अपेक्षेने पाहिले जाते. सध्या भारत आणि ब्रिटनमध्ये लष्करी वाहनांचे इंजिन, हॉवित्झर, हवाई सुरक्षा यंत्रणा, भुसूरूंगविरोधी यंत्रणा, हॉवरक्रॉफ्ट यासंबंधी सहकार्य सुरू आहे. या व्यतिरिक्त ब्रिटनने भारतीय नौदलासाठी ‘क्विन एलिझाबेथ’ श्रेणीतील विमानवाहू युद्धनौकेचा आराखडा पुरविण्याचीही तयारी व्यक्त केली आहे.

leave a reply