छत्तीसगडमध्ये ‘आयटीबीपी’च्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

कोरबा – छत्तीसगडमधील कोरबा जंगलाच्या बूभन्भाट भागात पाच किलो वजनाचा ‘आयईडी’ इंडो- तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) पथकाने शोधून काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर दांतेवाडा जिल्ह्यातील गुडसे गावात माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी पेरलेल्या ‘आयईडी’ स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत.

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून यामुळे माओवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे माओवाद्यांकडून जवानांसह गावकऱ्यांनाही लक्ष्य केले जात आहे. कोरबा जंगलाच्या बूभन्भाट भागात आयटीबीपीचे जवान गस्त घालत असताना राणापुलच्या जवळ पाच किलो वजनाचा आयईडी सापडला. त्यानंतर आयटीबीपीच्या जवानांनी या भागात शोधमोहिम राबवली, त्यात नव्या तंत्रज्ञानाने विकसित केलेला एक किलो वजनाचा आणखी एक बॉम्ब सापडला.

जवानांनी आयईडी व बॉम्ब पोलिसांकडे सुपूर्द केले. या भागात आयटीबीपीचे जवान नेहमीच गस्त घालतात. त्यामुळे जवानांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी हा आयईडी पेरलेला होता अशी माहिती आयटीबीपीच्या ४१ व्या बटालियनचे सीओ एस. खत्री यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात आयटीबीपीच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी पेरण्यात आलेला ७ किलोचा ‘आयईडी’ आयटीबीपीच्या ‘सोफिया’ या स्निफर डॉगने शोधून काढला होता. त्यानंतर दहा दिवसात अशाच प्रकारच्या हल्ल्याचा प्रयत्न उधळला गेला आहे.

दरम्यान, दांतेवाडा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या आयईडी स्फोटात एक जोडपे जखमी झाले. हे दांपत्य आपल्या नातेवाईकांना भेटायला जात होते. पण माओवाद्यांनी पेरलेल्या भुसुरूंग स्फोटाचे ते लक्ष्य ठरले. त्यानंतर या जखमी दांपत्याला माओवाद्यांनी १२ तास ओलीस ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा राखीव गार्डचे जवानांचे (डीआरजी) पथक पाठविण्यात आले.

या जवानांनी या जखमी दांपत्याची माओवाद्यांच्या तावडीतून सुटका केली. या महिलेच्या पायाला व चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत तर पुरुषाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. ” डीआरजीने या कारवाईत एका माओवाद्याला ५ किलो आयडीसह अटक केल्याची माहिती दांतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.

leave a reply