भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्य दृढ करणार

संयुक्त राष्ट्रसंघ – भारत व अमेरिकेने आपली धोरणात्मक भागीदारी अधिकच दृढ करण्याचा निर्धार केला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत टी. एस. तिरूमुर्ती व अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांच्या भेटीत यावर चर्चा झाली. याबरोबरच भारत गरीब व अविकसित देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवित असल्याचा उल्लेख करून लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी यासाठी भारताचे कौतुक केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून भारत सक्रीय आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारताने जगभरातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवरील आपली भूमिका प्रखरतेने मांडली आहे. यामध्ये दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचा मुद्दा अग्रस्थानी आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांच्याबरोबरील भारताचे राजदूत थिरूमुर्ती यांची चर्चा महत्त्वाची ठरते.

उभय देशांमधील धोरणात्मक सहकार्य अधिकच दृढ करण्यावर या चर्चेत एकमत झाले. सध्या म्यानमारमधील घडामोडींना फार मोठे महत्त्व आले असून या देशाची लष्कर लोकशाहीची मागणी करणार्‍या निदर्शकांवर निदर्यतेने कारवाई करीत आहे. ही कारवाई रोखण्यासाठी या क्षेत्रातील भारत व जपानसारख्या लोकशाहीवादी देशांचे सहाय्य घेतले जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. तसेच अफगाणिस्तानात तालिबनची आक्रमकता वाढत असताना, अमेरिकेला भारताचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांमध्ये झालेली चर्चा लक्षवेधी ठरते.

leave a reply