चिनी गस्तीनौकांच्या जपानच्या हद्दीतील घुसखोरीत चिंताजनक वाढ

गस्तीनौकाटोकिओ – जपानच्या सागरी हद्दीतील चीनच्या नौदल आणि तटरक्षकदलाच्या हालचाली अधिकाधिक आक्रमक होत असल्याचा आरोप जपानने केला आहे. फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवसांपैकी 26 दिवस चीनच्या गस्तीनौकांनी सेंकाकू द्विपसमुहाच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याचा ठपका जपानने ठेवला आहे. चीनच्या या घुसखोरीला जपानकडून उत्तर दिले जात आहे. पण आक्रमक बनलेल्या चीनच्या गस्तीनौकांच्या हालचाली धोकादायक बनल्याची चिंता जपानने व्यक्त केली.

1 फेब्रुवारी रोजी चीनने आपल्या तटरक्षक दलाच्या अधिकारात वाढ केली होती. चीन दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रात दुसर्‍या देशाच्या जहाजाने घुसखोरी केली, तर या परदेशी जहाजावर हल्ला चढविण्याचे अधिकार चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तटरक्षक दलाला दिले आहेत. ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या परवानगीशिवाय इतर कुठल्याही जहाजाने चीनच्या हद्दीत प्रवेश करू नये, असा इशारा चीनने महिन्याभरापूर्वी दिला होता. त्या दिवसापासून चीनच्या तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांनी जपानच्या सागरी हद्दीतील घुसखोरी वाढविली आहे.

जपानच्या सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कात्सुनोबू काटो यांनी चीनच्या गस्तीनौकांच्या वाढत्या घुसखोरीची माहिती दिली. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अधिकारांमध्ये वाढ केल्यापासून चिनी गस्तीनौकांनी जवळपास दरदिवशी सेंकाकूच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे काटो यांनी सांगितले. यापैकी पाच ते सहा वेळा चिनी गस्तीनौकांनी जपानी मच्छिमार बोटींच्या दिशेने धोकादायक प्रवास केला होता. सेंकाकू द्विपसमुह आणि जपानच्या सागरी हद्दीतील चिनी गस्तीनौकांची घुसखोरी ही अतिशय गंभीर घटना असल्याचे काटो यांनी म्हटले आहे. चीनचे फक्त तटरक्षक दलच नाही तर नौदलाच्या विनाशिका देखील या सागरी क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचा आरोप जपानने याआधी केला होता. गेल्या वर्षी तर चिनी विनाशिका आणि गस्तीनौकांनी तीनशेहून अधिक दिवस जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. तटरक्षक दलाच्या अधिकारांमध्ये वाढ केल्यानंतर ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’मधील चीनची आक्रमकता अधिक वाढेल, अशी चिंता जपान व्यक्त करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या या वाढत्या आक्रमकतेविरोधात अमेरिकेने ठाम भूमिका स्वीकारावी, असे आवाहन जपान करीत आहे.

leave a reply