परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतरही भारत-चीन सीमेवरील तणाव कायम

नवी दिल्ली – भारतीय सेनादल कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, अशा शब्दात संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देशाला आश्वस्त केले. संसदेच्या सुरक्षाविषयक समितीसमोर बोलताना, जनरल रावत यांनी ही ग्वाही दिली. कुठल्याही परिस्थितीत चीनला सीमेवरील स्थिती बदलण्याची संधी दिली जाणार नाही. आपल्या सार्वभौमत्त्वाच्या संरक्षणासाठी भारत कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असा संदेश संरक्षणदलप्रमुख जनरल रावत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून चीनला दिला जात आहे. मॉस्को येथे पार पडलेल्या चीनच्या द्विपक्षीय चर्चेतही जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना चांगलेच खडसावल्याचे समोर आले आहे. भारताने द्विपक्षीय करारांचे आरोप करणार्‍या चीनने लडाखच्या सीमाभागात ५० हजार सैनिकांची तैनाती कशासाठी केली आहे? या जयशंकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे उत्तर नव्हते. या चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात सीमावाद चर्चेने सोडविण्याचे मान्य करुनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करुन आपल्याला भारताबरोबर सलोखा प्रस्थापित करण्यात स्वारस्य नसल्याचे दाखवून दिले आहे.

तणाव

गुरुवारी मॉस्कोमध्ये भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. मुख्य म्हणजे या चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन पाच मुद्यांवर आपले एकमत झाल्याचे जाहीर केले. यामध्ये सीमेवरील तणाव कमी करणे, त्यासाठी द्विपक्षीय चर्चा सुरू ठेवणे आणि परस्परांवरील विश्वास दृढ करण्यासाठी पावले उचलणे या मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र, सदर संयुक्त निवेदनातून फारसे काही निष्पन्न होणार नाही, असे भारताचे माजी अधिकारी सांगत आहेत. चीन केवळ वेळ काढण्यासाठी या चर्चेचा वापर करीत आहे. प्रत्यक्षात लडाखच्या सीमेवर चीन अधिकाधिक लष्करी कुमक पाठवून आपली स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे, याकडे भारताच्या माजी लष्करी व गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष्य वेधले. परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि परराष्ट्रमंत्री वँग ई यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करण्यात आले व यात भारतविरोधी सूर लावण्यात आला आहे. या निवेदनात लडाखच्या सीमेवरील तणावाचे खापर भारतावरच फोडण्यात आले आहे.

परराष्ट्रमंत्र्यांच्या द्विपक्षीय चर्चेत चीनने भारताला सज्जड इशारे दिल्याचा दावा चिनी तसेच पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. पण प्रत्यक्षात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लडाखच्या सीमेवर ५० हजाराहून अधिक सैन्य तैनात करणार्‍या चीनला यावरुन प्रश्न विचारुन निरुत्तर केल्याचे समोर आले आहे. भारत नाही तर चीनच उभय देशांमधील कराराचा भंग करीत असल्याचे जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. पुढच्या काही तासात चीनने भारताबरोबरील सीमावाद वाटाघाटीने सोडविण्यासाठी आपण उत्सुक नसल्याचे दाखवून दिले. लडाखच्या सीमेवर अधिक लष्करी कुमक पाठवून तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती करुन चीन भारतावर दबाव वाढवू पाहत आहे. भारताने सैन्य मागे न घेतल्यास युद्ध पेटल्यावाचून राहणार नाही आणि सर्वच आघाड्यांवर चीनपेक्षा मागासलेला असलेल्या भारताची अवस्था दगडावर आपटणार्‍या अंड्याप्रमाणे होईल, अशी दर्पोक्ती चीनच्या सरकारी मुखपत्राने केली आहे.

त्याचवेळी भारतीय माध्यमे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींची विपर्यास माहिती देत असून चिनी लष्कर कमकुवत असल्याचा आभास निर्माण करीत असल्याची तक्रार चीनच्या ग्लोबल टाईम्सने केली आहे. मात्र एकदा का युद्ध सुरू झाले तर भारताला परिस्थितीची जाणीव होईल, असे चीनच्या या सरकारी वर्तमानपत्राने बजावले आहे. दरम्यान, ग्लोबल टाईम्सचा वापर करुन चीनची कम्युनिस्ट राजवट भारतावर मानसिक दबावतंत्राचे प्रयोग करू पाहत आहे. मात्र, भारत चीनच्या दबावाला बळी पडणार नाही, कुठल्याही आघाडीवर चीनचा सामना करण्यासाठी भारतीय संरक्षणदलांनी पूर्ण तयारी केलेली आहे, असे सांगून भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी चीनला आणखी एक इशारा दिला. काही दिवसांपूर्वी चीनच्या विरोधात लष्करी कारवाई होऊ शकते, असे जनरल रावत यांनी बजावले होते. त्यानंतर भारतीय सैनिकांनी ‘काला टॉप’ आणि ‘रेजाँग ला’ टेकड्यांचा ताबा घेतला होता. आता तर लडाखच्या सीमेवरील ‘फिंगर ४’ पर्यंत भारतीय सैनिकांनी आगेकूच केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचंड प्रमाणात कुमक वाढवूनही चीनच्या लष्कराला या क्षेत्रात भारतीय सैनिकांना थोपविणे शक्य झाले नसल्याचे अहवाल येत आहेत.

भारतीय लष्कराला इशारे आणि धमक्या देणार्‍या ग्लोबल टाईम्समध्येच काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात पर्वतीय क्षेत्रातील युद्धकौशल्यात भारतीय सैन्य सर्वोत्तम असल्याचे मान्य करण्यात आले होते. गलवानमधील संघर्ष तसेच २९-३० ऑगस्ट रोजी पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिणेकडे झालेल्या झटापटीत चिनी लष्कराने भारतीय सैन्याच्या पराक्रम व कौशल्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे चिनी लष्कराची पिछेहाट झाली ही बाब सार्‍या जगाच्या लक्षात आली असून यामुळे गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी चीनची दैनंदिन पातळीवर धडपड सुरू आहे. मात्र बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने चीन या संघर्षात अधिकाधिक रुतत चालल्याचे स्पष्टपणे दिसत असून इथून सन्मानिय माघार कशी घ्यायची, हा चीनसमोरील सर्वात मोठा पेच बनला आहे.

leave a reply