सिंधू जलवाटप करारासंदर्भात भारताचा पाकिस्तानला इशारा

- नोटीस पाठवून 90 दिवसात उत्तर देण्याची सूचना केली

सिंधू जलवाटपनवी दिल्ली – सहा दशकांपूर्वी भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जलवाटप करारासंदर्भात भारताने पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. पाकिस्तानने 90 दिवसात याला उत्तर द्यावे, अशी सूचना भारताने केली आहे. अन्यथा यासंदर्भात आपला निर्णय घेण्यास भारत मोकळा असेल, असा इशाराही भारताने दिला आहे. पहिल्यांदाच भारताने सिंधू जलवाटप करारासंदर्भात इतकी आक्रमक भूमिका स्वीकारल्याचा दावा केला जातो. दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धांच्या काळातही भारताने सदर कराराबाबत अशी कठोर भूमिका स्वीकारली नव्हती. मात्र भारतद्वेषी भूमिका स्वीकारणाऱ्या या देशाला यापुढे आपल्या वाट्याचे पाणी पुरविण्याचे औदार्य दाखविण्यास आपण तयार नाही, असा संदेश भारताने ही नोटीस पाठवून दिला आहे.

भारत व पाकिस्तानमध्ये 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जलवाटप करार झाला होता. यानुसार भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या वाटपाच्या मुद्यांचा समावेश होता. मात्र या कराराला सहा दशकांहून अधिक काळ झालेला आहे. तसेच या करारात काही गोष्टी अस्पष्ट आहेत. यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे भारताचे म्हणणे आहे. पण पाकिस्तान या सुधारणांना तयार नाही. उलट या कराराचे पालन भारतासाठी बंधनकारक असताना देखील, भारत नद्यांवर धरणे बांधून आपल्या वाट्याचे पाणी पळवत असल्याचा आरोप पाकिस्तान करीत आला आहे. मात्र आपले हे आरोप आंतरराष्ट्रीय लवादासमोर पाकिस्तानला सिद्ध करता आले नव्हते. उलट आपल्या वाट्याला येत असलेल्या पाण्याचा पाकिस्तानात अपव्ययच होत असल्याची बाब यात समोर आली होती.

किशनगंगा आणि रेटल जलविद्युत प्रकल्पावर आक्षेप घेऊन पाकिस्तानने 2015 साली जागतिक बँकेकडे धाव घेतली होती. सिंधू जलवाटप करारात जागतिक बँकेचाही सहभाग होता. त्यामुळे जागतिक बँकेकडे दाद मागून भारतावर दडपण टाकण्याची पाकिस्तानची योजना होती. पण या प्रकरणी चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला जागतिक बँकेने दिला होता. भारताने पाकिस्तानशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले व यासाठी 2016 सालापासून भारत पाकिस्तानशी चर्चा करीत आहे. पण पाकिस्तान या मुद्यावर चर्चा शक्य नसल्याचे आडमुठी भूमिका घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर, भारताच्या ‘इंडस्‌‍ वॉटर कमिशनरांनी’ पाकिस्तानला ही नोटीस बजावली असून 90 दिवसात त्याला उत्तर देण्याची सूचनाही केली आहे.

सिंधू जलवाटप कराराच्या सुधारणेवर चर्चा केली नाही, तर भारत आपले पुढचे निर्णय घेण्यासाठी मोकळा असेल, असा खरमरीत संदेश याद्वारे पाकिस्तानला देण्यात आला आहे. सिंधू जलवाटप करार झाल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये चार युद्ध झाली. त्या काळातही भारताने पाकिस्तानबरोबर केलेल्या या कराराचे उल्लंघन केले नव्हते. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतावर वारंवार हल्ले चढविले व घातपात घडवून निरपराध भारतीयांचा बळी घेतला. त्या काळातही भारताने हा करार मोडण्याचा विचार केला नव्हता. पण आता आपल्या औदार्याचा गैरफायदा पाकिस्तान मिळू न देण्याचा निर्धार भारताने केला आहे. यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानाला भारताकडून मिळत असलेले अतिरिक्त पाणी यापुढे दिले जाणार नाही, असा इशारा भारताकडून दिला जात आहे. त्यातही पाकिस्तानला मिळत असलेल्या पाण्याचा अपव्यय होत असून या देशाला जलनियोजनात स्वारस्य नसल्याचेही जगजाहीर झाले आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानला याची सुस्पष्ट शब्दात जाणीव करून दिली होती.

leave a reply