पंधरा क्षेत्रांकडे लक्ष पुरविल्यास भारत ‘आत्मनिर्भर’ होईल

- 'एसोचॅम'चा दावा

नवी दिल्ली – देशाला ‘आत्मनिर्भर’ बनविण्याचा संकल्प साध्य करायचा असेल, तर १५ क्षेत्रांकडे विशेष लक्ष पुरवावे लागेल. या क्षेत्रामध्ये उत्पादन क्षमता आपण वाढवू शकलो, तर दोन ते तीन वर्षात आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य साध्य करू शकेल, असा दावा देशातील उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘एसोचाम’ने केला आहे. ‘एसोचाम’कडून या १५ क्षेत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Assocham-Indiaकोरोनाव्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यावेळी पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्पही जाहीर केला होता. या ‘आत्मनिर्भर’ मोहिमेंतर्गत काही योजनांची घोषणा करण्यात आली होती. तसेच पंतप्रधानांनी ‘एसोचॅम’सह विविध उद्योग संस्थांना व संघटनांना यादृष्टीने लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (एसोचाम) या देशातल्या साडे चार लाखांहून अधिक कंपन्या आणि व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने १५ क्षेत्रांची एक यादी तयार केली आहे. इंधन तेल वगळता भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या माहितीचे विश्लेषण करून ‘एसोचाम’ने ही १५ क्षेत्रे वेगळी काढली आहेत.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कोळसा, पोलाद, लोखंड, लोहविरहित इतर धातू, वनस्पती तेल, प्लास्टिक, औषधांचा कच्चा माल या सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. देशात लॉकडाऊन असूनसुद्धा मे महिन्यात २.८ अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आयात करण्यात आले होते. सामान्य स्थितीत भारतात दर महिन्याला ५ अब्ज डॉलर्सचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आयात होते.

Assocham-logoएवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्सची आयात होत असल्याने देशाकडील परकीय चालन खर्च होते. त्यामुळे या क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याची आवश्यकता असल्याचे, ‘एसोचाम’ने म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन वाढविण्यसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या सवलती आणि प्रोत्साहन यॊजनांचा लाभ या क्षेत्राला होईल, असा विश्वासही ‘एसोचाम’ने व्यक्त केला आहे.

चीनबरोबर वाढल्येल्या तणावानंतर चीनमधून विविध वस्तूंची आयात बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. तर चीनकडून भारतात होणाऱ्या चिनी उत्पादनांवर बंदीच्या मोहिमेची खिल्ली उडविण्यात येत आहे. तसेच देशातही काही जण चीनमधून वस्तूंची आयात थांबविल्यास भारतालाच अडचणींचा सामना करावा लागेल असा दावा करीत आहेत. मात्र देशातील कित्येक उद्योजक भारतात उत्पादन क्षमता वाढवून चीनमधून आयात कमी करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सांगत आहेत. कित्येक खाजगी कंपन्यांनी चीनबरोबर झालेले करार रद्द केले आहेत. सोमवारी ‘जेएसडब्लू’ ग्रुपचे सज्जन जिंदाल यांनी चीनमधून आयात रोखण्यासाठी उद्योजकांनी मिळून काम करायला हवे, असे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर ‘एसोचॅम’ने ही यादी जाहीर केली आहे. या यादीत असलेल्या बहुतांश क्षेत्रात आयात होणारे सामान मोठ्या प्रमाणावर चीनकडून आयात केले जाते. देशात आयात होणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’पैकी ४३ टक्के आयात ही चीनमधून होते. त्यामुळे ‘एसोचॅम’ जाहीर केलेल्या यादीतील क्षेत्रात भारताची उत्पादन क्षमता वाढल्यास चीनला येत्या काळात मोठी बाजारपेठ गमवावी लागेल, असे दिसून येत आहे.

leave a reply