साऊथ चायना सी मधील तैनातीवर चीनने दिलेल्या धमकीला अमेरिकेचे प्रत्युत्तर

वॉशिंग्टन/बीजिंग – साऊथ चायना सी क्षेत्रातील अमेरिकेची वाढती संरक्षणतैनाती चीनला चांगलीच झोंबली आहे. अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये सराव करीत असतानाच, चीनच्या सरकारी मुखपत्राने आमची क्षेपणास्त्रे त्यांचा वेध घेण्यास तयार आहेत, अशा शब्दात धमकावले आहे. चीनच्या या धमकीला अमेरिकन नौदलाने प्रत्युत्तर दिले असून, तुमच्या धमकीनंतरही आमच्या युद्धनौका आहे त्याच भागात सराव करीत आहेत, असा टोला लगावला. चीनचा सूर अधिक तीव्र होत असतानाच ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या अमेरिकेच्या आघाडीच्या मित्रदेशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपली तैनाती वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

USA-Chinaगेल्या आठवड्यात चीनच्या नौदलाकडून साऊथ चायना सीमधील ‘पॅरासेल आयलंड’ भागात सराव सुरू करण्यात आला होता. त्याचवेळी अमेरिकेने आपल्या दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौकांसह इतर युद्धनौका त्याच भागात धाडल्या होत्या. चीनने आपण रविवारपर्यंत सराव सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते; तर अमेरिकेने आपला सराव शनिवारपासून सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. अमेरिका व चीनने एकाच वेळी एकाच भागात सराव करण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना ठरली होती. सध्या या देशांमध्ये असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे एखाद्या छोट्याशा दुर्घटनेतून संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशाराही विश्लेषकांनी दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने दिलेली धमकी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. ‘साऊथ चायना सी हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सहज आवाक्यात असलेले क्षेत्र आहे. अमेरिकेच्या कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेचा या क्षेत्रातील वावर पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी आनंदाचीच गोष्ट ठरते. चीनच्या लष्कराकडे डीएफ-२१डी व डीएफ-२६ यासारखे विमानवाहू युद्धनौकांना सहज उद्ध्वस्त करणारी प्रगत क्षेपणास्त्रे आहेत,’ असा इशारा ग्लोबल टाईम्स या आपल्या लेखात दिला.

ग्लोबल टाईम्सच्या या धमकीला अमेरिकन नौदलाने तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्या दोन विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्येच वावरत आहेत. यूएसएस निमित्झ व यूएसएस रोनाल्ड रेगन धमक्यांना घाबरणाऱ्या नाहीत’, अशा नेमक्या शब्दात अमेरिकन नौदलाने चीनला टोला लगावला. गेले दोन महिने अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वावरत असून जपान व ऑस्ट्रेलियाबरोबर युद्धसरावही पार पडले आहेत. आपली ही संरक्षणतैनाती व सराव, सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य तसेच या क्षेत्रातील सहकारी देशांना आश्‍वस्त करणे या उद्देशाने असल्याचे अमेरिकेकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, साऊथ चायना सीच्या मुद्यावर अमेरिका व चीनमधील तणाव वाढत असतानाच ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या अमेरिकेच्या मित्रदेशांनीही चीनचा प्रभाव क्षेत्रातील आपली तैनाती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ब्रिटनच्या तीनही संरक्षणदलांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात ब्रिटिश संरक्षणदलांची आशियातील तैनाती वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या निर्णयावर चीनकडून तिखट प्रतिक्रिया उमटली असून ब्रिटनला पुन्हा ‘ओपियम वॉर’ छेडायचे आहे का, असा टोला चिनी माध्यमांनी लगावला आहे. १९व्या शतकात अमली पदार्थांच्या व्यापारावरून ब्रिटन व तत्कालीन चिनी साम्राज्यात दीर्घकाळ झालेला संघर्ष ‘ओपियम वॉर’ म्हणून ओळखण्यात येतो.

कोरोनाव्हायरसच्या साथीला चीन जबाबदार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनला याचा गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. मात्र अमेरिकेच्या विचारांचा आपल्यावर परिणाम झालेला नाही, हे दाखविण्यासाठी चीन आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या नौदलाचे सामर्थ्य प्रदर्शन करीत आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान या देशांच्या विरोधात चिनी नौदलाने आक्रमक कारवाया सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेसह मित्रदेशांनी चीनला उत्तर देण्याची जोरदार तयारी केल्याचे नव्या घडामोडीवरून दिसत आहे.

leave a reply