व्हॉटसॲप, टेलिग्रामच्या धर्तीवर भारतीय लष्कराने ‘एसएआय ॲप’ विकसित केले

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत दुसऱ्या कुठल्याही ॲप्लिकेशनवर अवलंबून न राहता परस्परांशी संपर्क साधण्यासाठी ‘सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट (एसएआय) नावाचे एक सुरक्षित आणि साधे मेसेजिंग ॲप विकसित केले आहे. सध्या अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरक्षित व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि मजकूर संदेश सेवा उपलब्ध असतील. येत्या काही दिवसांत हे ॲप सुरू होणार असून व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम, जीआयएमएस सारख्या व्यावसायिक मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनशी स्पर्धा करणारे असेल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

'एसएआय ॲप'

भारतीय लष्करातील अधिकारी, जवानांकडून परस्परांशी संवाद साधण्यासाठी व्हाटसॲप, टेलिग्राम यासारख्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला जातो. पण या ॲप्लिकेशनचे सर्व्हर देशाबाहेर आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब ठरते. त्यात गलवानच्या संघर्षानंतर भारतीय लष्कराने संभाषणाचे ॲप्स वापरण्यावर निर्बंध घातले. तसेच चायनीज ॲप्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म , ई-कॉमर्स, कॅमेरा ॲप्स, ब्राउझर्स तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्रू कॉलर इत्यादी अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगण्यात आले.

भारतीय लष्कराने विकसित केलेले ‘एसएआय’चे सर्व्हर एनआयसीला जोडलेले असेल, जेणेकरून सर्व डेटा देशातच राहील. संरक्षणदलांच्या आवश्यकतेनुसार ‘एसएआय’ ॲपची निर्मिती करण्यात आली असून ती व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. या ॲप्लिकेशनमध्ये सुरक्षित कॉलिंग सेवा, संदेश सेवा आणि व्हिडीओ कॉलिंग सेवेला देखील सपोर्ट करेल. सध्या तरी हे ॲप्लिकेशन अँड्रॉईड सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनमध्ये वापरता येणार आहे. तसेच या ॲप्लिकेशनमध्ये लोकल इन हाऊस सर्व्हरसह कोडिंगच्या दृष्टीने सुरक्षेचे सर्व फिचर्सआहेत. तसेच त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक बदल करता येऊ शकतात, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सीईआरटी-इन पॅनेलमधील लेखापरीक्षक आणि लष्कराच्या सायबर ग्रुपच्या तपासणीनंतर या ॲप्लिकेशनच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. आता हे अ‍ॅप इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट’कडे(आयपीआर) पेटंटसाठी पाठविण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या आयओएस आवृत्तीवर काम चालू असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.

leave a reply