टेरर फंडिंग प्रकरणात ‘एनआयए’चे सलग दुसऱ्या दिवशी छापे

- दिल्लीसह श्रीनगरमध्ये कारवाई

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सलग दुसऱ्या दिवशी दहशतवादी कारवायांंसाठी निधी जमविणाऱ्या नऊ ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यात श्रीनगर आणि दिल्लीमधील ठिकाणांचा समावेश असून यात सहा स्वयंसेवी संस्था व ट्रस्टस् यांचा समावेश आहे. दिल्लीतील अल्पसंख्याक आयोगाचे माजी प्रमुख जफरूल इस्लाम खान यांच्या मालमत्तांवरही एनआयएने छापे टाकले आहेत. बुधवारीदेखील एनआयएने अशीच कारवाई करताना जम्मू-काश्मीरच्या दहा ठिकाणांसह बंगळूरूत धाडी टाकल्या होत्या.

टेरर फंडिंग

बुधवारी एनआयएने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर व बांदीपोरामधील स्वयंसेवी संस्थेसह एकूण १० ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. जम्मू-काश्मीरमधील या संघटनांकडून व्यवसाय व सामाजिक कार्याच्या नावावर परदेशातून मिळणारा निधी दहशतवादी कारवायांंसाठी वापरला जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईला वेग आला आहे. गुरुवारी ‘एनआयए’ने श्रीनगर आणि दिल्लीमधील ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यामध्ये ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’, ‘चॅरिटी अलायन्स’, ‘ह्यूमन वेल्फेअर फाऊंडेशन’, ‘जेके यतीम फाऊंडेशन’, ‘सॉल्वेशन मूवमेंट’ आणि ‘जे ॲण्ड के व्हॉईस ऑफ विक्टिम्स’च्या (जेकेवीवीवी) कार्यालयांचा समावेश आहे. दिल्लीत टाकलेल्या धाडीत स्वयंसेवी संस्थांना पाकिस्तानातून निधी मिळत असल्याचे महत्वपूर्ण पुरावे सापडले आहेत.

‘चॅरिटी अलायन्स’ व ‘ह्युमन वेल्फेअर फाउंडेशन’ या संस्था दिल्लीतील असून उर्वरित ‘एनजीओ’ जम्मू-काश्मीर मधील आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये श्रीनगरसह बारामुल्ला, अनंतनाग व कुलगामचा समावेश आहे. या स्वयंसेवी संस्था व विश्वस्त संस्थांवर गेल्या काही दिवसांपासून नजर ठेवण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली केस दाखल करण्यात आली होती.

बुधवारी ‘एनआयए‘ने दहशतवादी कारवायांंसाठी निधी जमविणाऱ्या श्रीनगर आणि बांदीपोरातील १० जागांवर धाडी टाकल्या होत्या. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या सिव्हील सोसायटीचे कॉर्डिनेटर खुर्रम परवेझ यांचे घर आणि कार्यालयांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त परवेझ अहमद बुखारी, परवेझ अहमद मट्टा आणि बंगळूरूतील सहकारी स्वाति शेषाद्रि, परवीना अहंगर यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. यामध्ये ‘एनआयए’ला ‘टेरर फंडिंग’ संदर्भात महत्वाची कागदपत्रे सापडली होती.

leave a reply