भारतीय लष्कराने एलएसीवर चीनला बांधकाम करू दिलेले नाही

- लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची ग्वाही

नवी दिल्ली – लडाख व अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीनने मोठ्या प्रमाणात लष्करी बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आल्याची चिंता काहीजणांनी व्यक्त केली होती. मात्र लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी याबाबत देशाला आश्‍वस्त केले आहे. एलएसीवर आपले नियंत्रण असलेल्या एलएसीवरील भागात भारतीय सैन्याने चीनला एक वीट देखील रचू दिलेली नाही, अशी ग्वाही लष्करप्रमुखांनी दिली. चीन आपल्या हद्दीत बांधकाम करीत असले, तर त्यावर आक्षेप घेता येणार नाही, याकडेही लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लक्ष वेधले.

भारतीय लष्कराने एलएसीवर चीनला बांधकाम करू दिलेले नाही - लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची ग्वाहीलडाखच्या एलएसीवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, भारतात खळबळ माजविणार्‍या बातम्या सोडण्याचा सपाटा चीनने लावला होता. यासाठी चीन आपल्या सरकारी माध्यमांचा मोठ्या चतुराईने वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच आपल्या प्रभावाखाली आलेल्या पाश्‍चिमात्य माध्यमांच्या गटाचा देखील चीन यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे. यानुसार भारताच्या एलएसीमध्ये घुसखोरी करून चीनने मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केल्याचे दावे समोर आले होते. इतकेच नाही तर या बांधकामापासून भारताच्या सुरक्षेला धोका संभवतो, अशीही चर्चा सुरू झाली होती. पण त्यात तथ्य नसल्याचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.

भारताच्या एलएसीवर चीनला एक वीट देखील रचू देण्यात आलेली नाही, अशी ग्वाही लष्करप्रमुखांनी दिली. लडाखच्या एलएसीवर देखील भारत व चीनची तैनाती ठरल्यानुसार कमी झालेली आहे, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. वादग्रस्त भागात कुणीही बांधकाम केलेले नाही, याबाबत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे जनरल नरवणे म्हणाले. असे असले तरी चीन एलएसीवर आपले नियंत्रण असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली करीत आहे, ही बाब जनरल नरवणे यांनी नाकारलेली नाही. तसेच आपल्या हद्दीत चीन मोठ्या प्रमाणात बांधकाम करीत आहे, असे संकेत लष्करप्रमुखांनी दिले. मात्र यावर भारताला आक्षेप घेता येणार नाही, ही बाब लष्करप्रमुखांनी लक्षात आणून दिली.

लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्याने आपल्या लष्कराच्या तोडीस तोड तैनाती केल्याने चीनचा भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यानंतरच्या काळात चीनने अरुणाचल प्रदेशजवळील एलएसीवर लष्करी हालचाली करून दुसरी आघाडी उघडण्याची योजना आखली होती. यालाही भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर मिळाल्यानंतर, चीनने निराळे डावपेच वापरून आपण भारतावर कुरघोडी करीत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या एलएसीमध्ये घुसून चीनचे लष्कर बांधकाम करीत असल्याच्या बातम्या याचीच साक्ष देत आहेत. मात्र हा चीनच्या अपप्रचाराचा भाग असल्याचे संकेत देऊन लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पुन्हा एकदा चीनच्या अपप्रचाराला उत्तर दिले आहे.

leave a reply