भारतीय लष्कराने लडाखच्या ‘एलएसी’वर क्षेपणास्त्रे रोखली

नवी दिल्ली – सुपरसोनिक ‘ब्रह्मोस’, जमिनीतून आकाशात मारा करू शकणारे ‘आकाश’, हजार किलोमीटरवरील लक्ष्य अचूकपणे टिपणारे ‘निर्भय’ ही काही क्षेपणास्त्रे भारताने लडाखच्या सीमेवर तैनात केली आहेत. याच्याबरोबरीने उभय देशांमधील चर्चेत झालेल्या निर्णयांचा आदर जोवर चीनकडून केला जात नाही, तोपर्यंत सीमेवर शांतता नांदणे शक्यच नाही, असा संदेश भारताने चीनला दिला आहे. तर सध्या ‘एलएसी’वर युद्धही नाही आणि शांतताही नाही, पण वायुसेना कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे सूचक उद्‍गार भारताचे वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी काढले आहेत.

क्षेपणास्त्रे

भारत आणि चीनमध्ये लडाखच्या ‘एलएसी’वर झालेल्या चर्चेत भारताने अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. वारंवार घुसखोरी करुन भारताच्या भूभागावर अधिकार सांगणार्‍या चीनने आपली सीमा नक्की कुठपर्यंत आहे, ते आधी स्पष्ट करावे, ही मागणी भारताने लावून धरली आहे. यामुळे चीनची पंचाईत झाली असून आधी भारताने लडाखमधून सैन्य माघारी घ्यावे, मग यावर चर्चा करता येईल, असा सूर लावला होता. पण भारत यावेळी चीनवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. भारतीय सैन्याने कडाक्याच्या थंडीतही लडाखमध्ये प्रदिर्घकाळ वास्तव्याची तयारी केली आहे. तर दुसर्‍या बाजूला इथल्या हवामानाची सवय नसलेले चिनी जवान गारठून आजारी पडू लागले आहेत. अशा स्थितीतही चीनकडून भारताला धमक्या, इशारे व चिथावण्या देण्याचे सत्र सुरूच आहे.

चीनला लडाखला भारताचा केंद्रशासित भूप्रदेश मानत नाही, अशी चिथावणी चीनने दिली आहे. यावर भारताकडून त्वरीत प्रतिक्रिया आली असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतची चीनची एकतर्फी भूमिका भारताने कधीही स्वीकारलेली नाही. १९५९ सालापासून भारताची याबाबतची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात बदल झालेला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडसावले. याबरोबरच उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेतील निर्णयांचा आदर राखला नाही, तर सीमेवर शांतता नांदणार नाही, याचीही परखड जाणीव भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला करुन दिली आहे. चीनने भारताचा विश्वास गमावला आहे, हे भारत मार्गाने चीनपर्यंत पोहोचवित आहे आणि ठोस कृतीशिवाय भारत चीनवर विश्वास ठेवणार नाही, असा खरमरीत इशारा भारताकडून दिला जात आहे.

भारत युद्धासाठी तयार आहे व ही तयारी केवळ शाब्दिक नाही, याचाही प्रत्यय चीनला येत आहे. ब्रह्मोस, आकाश आणि निर्भय क्षेपणास्त्रे लडाखच्या सीमेवर तैनात करुन चीनवर रोखण्याची धमक भारताकडे आहे, याचाही अनुभव चीन घेत आहे. भारताची मॅकेनाईज् इंफंट्री याआधीच एलएसी’वर दाखल झाली असून आमच्या सैनिकांचे मनोबल उच्च कोटीचे असल्याची ग्वाही लष्करी अधिकारी देत आहेत. या दरम्यान, वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी सध्या लडाखच्या एलएसी’वर युद्धही नाही आणि शांतताही नाही, अशी स्थिती असल्याचे विधान केले आहे. इथे कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटू शकते, हे वायुसेनाप्रमुख वेगळ्या शब्दात सांगत आहेत. चिनी लष्कराने कुठल्याही प्रकारची आगळीक केली तर त्याला गोळीबाराने उत्तर देण्याचे आदेश भारतीय लष्कराला याआधीच मिळाले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध पेट घेईल, अशी चिंता चीनच्या सरकारी मुखपत्राने व्यक्त केली होती.

चीनकडून दिल्या जाणार्‍या युद्धांच्या धमक्यांचा आपल्यावर परिणाम होणार नाही. उलट यामुळे भारत आपली युद्धसज्जता वाढवित राहील, असे याचीही जाणीव चीनला झाली आहे. त्याचवेळी, भारत अक्साई चीन ताब्यात घेण्यासाठी कधीही हल्ला चढवू शकतो, अशी भीती चीनचे माजी लष्करी अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. हल्लेखोर व घुसखोरीच्या भूमिकेतला चीन आता बचावात्मक भूमिका स्वीकारू लागल्याचे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत चीन आपल्या संरक्षण साहित्यांबद्दल करीत असलेले दावे पोकळ असल्याचा गौप्यस्फोट एका जर्मन कंपनीने केला आहे. आपल्याकडे रडार यंत्रणेला गुंगारा देणारी स्टेल्थ लढाऊ विमाने व हेलिकाप्टर्स आणि क्षेपणास्त्रे आहेत, असा प्रचार चीनने केला होता. यात तथ्य नसून चीनकडे इतके प्रगत तंत्रज्ञान नाही, असे या जर्मन कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात आपण तांत्रिकदृष्ट्या वरचढ असल्यामुळे भारतावर सहज मात करू, हा चीनचा दावा निकालात निघाल्याचे निघत आहे.

leave a reply