नेपाळमध्ये चीनविरोधात जोरदार निदर्शने

काठमांडू – मंगळवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चीन विरोधात जोरदार निदर्शने झाली. चीनने नेपाळच्या जमिनीवर कब्जा केला असून याविरोधात नेपाळमध्ये असंतोष वाढला आहे आणि नेपाळ सरकारवर तेथील जनतेकडूनच टीकेचा जोरदार भडीमार होत आहे. त्याचवेळी नेपाळच्या चीनमधील राजदूतांनी चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भारतावर केलेल्या आरोपावर ही नेपाळमधील तज्ञांनी जोरदार टीका केली आहे. नेपाळची भूमी चीनने नव्हे तर भारताने बळकावली आहे, असा आरोप नेपाळी राजदूत महेंद्र बहादूर पांडेय यांनी केला होता.

निदर्शने

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भारतविरोधी आणि चीनधार्जिण्या धोरणावर नेपाळमध्ये जोरदार टीका होता आहे. भारताच्या भूभागावर दावा करून एक राजकीय नकाशा प्रसिद्ध करणारे के. पी. ओली यांचे सरकार चीनने बळकावलेल्या भूभागाबद्दल गप्प आहे. नेपाळ सरकारच्या या धोरणामुळे भारताबरोबरील संबंध बिघडले आहेत. मात्र नेपाळला भारताशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे नेपाळमधील विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. नेपाळी माध्यमांनी चीनने बळकावलेल्या भूभागाबद्दल नुकतेच आणखी काही खुलासे केले आणि नेपाळ सरकारला काही प्रश्न विचारले.

यापार्श्वभूमीवर काठमांडूमधील नेपाळच्या दूतावासाबाहेर नेपाळी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीन करीत असलेले बांधकाम अवैध्य असून चीनने अतिक्रमण केलेला हा भाग नेपाळचा आहे, तसेच आमच्या सीमेतून परत जा, अशी घोषणाबाजी यावेळी निदर्शकांनी केली. तसेच नेपाळच्या विरोधीपक्षांनीही ओली यांच्या सरकारला चीनच्या अतिक्रमणावरून प्रश्न विचारले आहेत.

चीनने बळकावलेल्या जमिनीवरून नेपाळमध्ये रणकंदन माजले असताना, चीनमधील नेपाळी राजदूत पांडेय यांनी ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीवरून आणखीनच टीका होऊ लागली आहे. नेपाळची जमीन चीनने नव्हे भारताने बळकावली आहे. नेपाळ नेहमी स्वतंत्र देश राहिला असून भारत एक वसाहत होता, असे तारे नेपाळी राजदूतांनी तोडले आहेत. याशिवाय भारतीय माध्यमे चीन आणि नेपाळविषयी चुकीच्या बातम्या पसरवीत असल्याचे पांडेय यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे नेपाळी माध्यमांनीच चीनने बळकावलेल्या नेपाळी भूभागाचा खुलासा केला होता. अशावेळी नेपाळी राजदूतांचे हे आरोप बिनबुडाचे सिद्ध होत आहेत.

नेपाळी राजदूत पांडेय यांनी तिबेटींबाबतही विखारी विधाने केली आहेत. तिबेट चीनचा भाग असून नेपाळ वन चायना पॉलिसीचे समर्थन करतो. तिबेट सोडलेले काही नागरिक भारतात राहतात. तसेच भारत आणि नेपाळमध्ये खुल्या सीमेचा लाभ घेत घुसखोरी करतात. मात्र आपला मित्र देश असलेल्या चीनविरोधात नेपाळ आपली भूमी वापरायला देणार नाही असे, पांडेय यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीनंतर नेपाळमधील विश्लेषक, अभ्यासक आणि राजकीय पक्ष पांडेय यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत. नेपाळी राजदूतांची ही विधाने राजनैतिक दृष्ट्या चुकीचे असून प्रोटोकॉल च्या विरोधात आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी नेपाळचे राजदूत लिलामनी पौडियाल यांना माघारी बोलवून पांडे यांची अचानक नियुक्ती केली होती.

leave a reply