इराणवर निर्बंध लादून अमेरिकेने अमानुषतेचे प्रदर्शन केले

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेवर टीका

तेहरान – ‘अमेरिकेने लादलेल्या निर्बंधामुळे इराणच्या जनतेचे १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे अवैध आणि अमानुष निर्बंध तसेच दहशतवादी कारवायांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला असून इराणने आतापर्यंत अशा प्रकारची अमानुषता पाहिली नव्हती’, अशी जहरी टीका इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. तर अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे इराणची कोरोनाच्या विरोधातील लढाई प्रभावित होत असून हे निर्बंध म्हणजे अमेरिकेचा वैद्यकीय दहशतवाद असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रंत्री जावेद झरीफ यांनी केला.

इराणवर निर्बंध लादून अमेरिकेने अमानुषतेचे प्रदर्शन केले - इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेवर टीका२०१८ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेण्याची घोषणा केली. या कराराचा गैरफायदा घेत इराणने आपला आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रम अधिक मजबूत केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. या माघारीबरोबर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळात अमेरिकेने इराणवरील निर्बंध वाढविले आहेत. अमेरिकेच्या या निर्बंधांचा आपल्या अणुकार्यक्रमावर कुठलाही परिणाम होत नसल्याचा दावा इराणने केला होता. मात्र अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याची कबुली इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली.

अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध अवैध आणि अमानुष असल्याचा संताप रोहानी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरुन व्यक्त केला. या निर्बंधांमुळे इराणच्या जनतेचे १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे रोहानी यांनी जाहीर केले. या निर्बंधांमुळे इराणी जनतेला औषधे आणि अन्न खरेदी करता येत नसल्याचा आरोप इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. त्यामुळे इराणच्या जनतेने स्वत:वरील संकटासाठी अमेरिकेला शिव्याशाप द्यावा, अमेरिकेचा विद्वेष करावा, असेही रोहानी यांनी संबोधित केले.

इराणवर निर्बंध लादून अमेरिकेने अमानुषतेचे प्रदर्शन केले - इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेवर टीकाइराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी देखील अमेरिकेने निर्बंध वैद्यकीय दहशतवादाचे उत्तम उदाहरण असल्याचा ठपका ठेवला. या निर्बंधांमुळे कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय सहाय्य मिळविण्यात अडचणी येत असल्याचा आरोप रशियन वृत्तवाहिनीशी बोलताना केला. या कोरोनाव्हायरसमुळे इराणमध्ये ४,४६,४४८ जण बाधित झाले असून २५,५८९ जणांचा बळी गेल्याची माहिती इराणच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

पण इराणची राजवट कोरोनाच्या रुग्णांची तसेच बळींची संख्या दडवित असल्याचा आरोप खामेनी राजवटीचे विरोधक करीत आहेत. इराणच्या जनतेमध्येही याविरोधात असंतोष खदखदत असून इराणच्या संसदेत याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी यासाठी अमेरिकेचे निर्बंध जबाबदार असल्याचा आरोप केल्याचे दिसत आहे.

leave a reply