भारताने उभारलेले म्यानमारमधील ‘सित्वे’ बंदर लवकरच कार्यान्वित होणार

नवी दिल्ली – भारताने विकसित केलेले ‘पूर्वेकडील छाबहार’ म्हणून ओळखण्यात येणारे म्यानमारमधील ‘सित्वे’ बंदर पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान कार्यान्वित होईल. कोरोनाच्या संकटानंतरही वेळच्याआधी हे बंदर भारताकडून कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच या बंदराचे संचालनही भारत करणार आहे. भारताने म्यानमारच्या ‘सित्वे’ बंदराचा केलेला विकास हा ‘कलादन मल्टी मॉडेल प्रोजेक्ट’चा भाग असून यामुळे भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. तसेच सिलगुडी कॉरिडॉरची निर्भरता कमी होईल. यापार्श्वभूमीवर वेळेआधी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या या ‘सित्वे’ बंदराचे महत्व वाढते.

'सित्वे'

गुरुवारी भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, तर म्यानमारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व स्थायी सचिव यू सोई हान यांनी केले. यावेळी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रातील संबंधांवर चर्चा झाली. तसेच ‘कलादन मल्टी मॉडेल प्रोजेक्ट’अंतर्गत उभारले जाणाऱ्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी ‘नेबर फर्स्ट’ आणि ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणांतर्गत म्यानमारमधील भारताच्या गुंतवणूकीशी संबंधित काही योजनांची घोषणा केली. यामध्ये सित्वे बंदर विकास कामांचा समावेश आहे.

चर्चेनंतर ‘सित्वे’ बंदर पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदराचे संचालन भारताकडे सोपविण्याचेबाबतही सहमती झाल्याचे वृत्त आहे. भारत-म्यानमार-थायलंडला जोडणार्‍या त्रिपक्षीय महामार्गावरील ६९ पुलांच्या उभारणीसाठी लवकरच निविदा मागविण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भातही परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी घोषणा केली. म्यानमारवर चीनच्या असलेल्या प्रभावानंतरही भारत या देशबरोबर धोरणात्मक संबंध मजबूत करण्यात यशस्वी ठरल्याचे भारत म्यानमारमध्ये उभारत असलेल्या प्रकल्पांवरून स्पष्ट होते.

'सित्वे'

‘सित्वे’ बंदर विकसित करण्यासाठी भारताने म्यानमारला १.४ अब्ज डॉलर्सचे आर्थिक सहाय्य दिले होते. ‘सित्वे’ बंदरामुळे सिक्कीम-पश्चिम बंगालमधील सिलगुडी कॉरिडॉरवरील निर्भरता कमी करता येईल. सिलगुडी कॉरिडॉर ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा चिंचोळा पट्टा असून चीनबरोबर संघर्षात हा मार्ग बंद झाल्यास भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग मिळेल. ईशान्य भारतातून सिलगुडी कॉरिडॉरचा वापर न करता कोलकातापर्यंत पोहोचता येईल.

सध्या मिझोरमहून कोलकाताला पोहोचण्यासाठी १८८० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. मात्र ‘सित्वे’ बंदर आणि मिझोरमच्या एनएच-५४ राष्ट्रीय महामार्गामधील अंतर केवळ १४० किलोमीटर आहे. त्यामुळे कोलकात्याहून समुद्रीमार्गाने ‘सित्वे’ बंदर आणि तेथून मिझोरमपर्यंत पोहोचण्यासाठीचेअंतर अर्ध्याहून कमी होणार आहे. यावरून भारताने विकसित केलेल्या म्यानमारमधील बंदराचे व्यूहरचनात्मक महत्व अधोरेखित होते.

leave a reply