अंदमान- निकोबारमध्ये ‘पी-८’ विमान उतरवून अमेरिकेचा चीनला इशारा

पोर्ट ब्लेअर – लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असताना अमेरिकेने ‘पी-८ पोसायडन’ पाणबुडी शोधक टेहळणी विमान अंदमान निकोबार बेटावर उतरविले. विमानात इंधन भरण्यासाठी अमेरिकेचे हे विमान पोर्ट ब्लेअरमधील विमानतळावर उतरविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र याद्वारे अमेरिकेने चीनला कडक इशारा दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

'पी-८'

२५ सप्टेंबर रोजी अमेरिकी नौदलाचे ‘पी-८ पोसायडन’ हे टेहळणी विमान इंधन भरण्यासाठी पोर्टब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आल्याचे वृत्त आहे. २०१६ साली भारत आणि अमेरिकेमध्ये पार पडलेल्या ‘लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ अॅग्रीमेंट’ (एलईएमओई) करारानुसार दोन्ही देश परस्परांचे लष्करी तळ वापरू शकतात. या लॉजिस्टिक्स करारानुसार अमेरिकेचे ‘पी-८पोसायडन ‘हे टेहळणी विमान इंधन भरण्यासाठी उतरविण्यातआले होते.

काही दिवसांपूर्वीच याच करारांतर्गत भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस तलवार’ या अरबी समुद्रात तैनात युद्धनौकेत अमेरिकेच्या ‘युएस एनएस युकून’ टँकरने इंधन भरले होते. अमेरिकेसह भारताचा जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससोबतही लॉजिस्टिक्स करार पार पडला आहे. मात्र अंदमान- निकोबारमध्ये उतरविण्यात आलेले अमेरिकेचे लष्करी टेहळणी विमान हा चीनसाठी इशारा ठरतो, असा दावा सामरिक विश्लेषक करीत आहेत. जुलै महिन्यात अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ यौद्धानौकेने याच भागात भारतीय नौदलाबरोबर युद्धसराव केला होता. याद्वारेही चीनला सामरिक संदेश देण्यात आला होता, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय संरक्षण दलांच्या ताफ्यातही ‘पी-८’ विमाने आहेत. तसेच भारताने या विमानांचा वापर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरच्या चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करीत आहे. तसेच २०१७ सालच्या ७३ दिवसांच्या डोकलामच्या वादातही भारताने चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ‘पी-८’ चा प्रभावीपणे वापर केला होता.

leave a reply