कोरोनाचे संकट मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेत आहे

- केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली – कोरोनामुळे आलेले संकट मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था उभारी घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात होणारी विदेशी संस्थागत गुंतवणूक सुमारे २५ हजार ७८७ कोटी रुपयांवर गेली होती. याचा दाखला देऊन केंद्रीय अर्थराज्य मंत्र्यांनी देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

देशाची अर्थव्यवस्था ‘व्ही शेप’ अर्थात कोरोनाचे संकट मागे टाकून जोरदार उसळी घेण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत. विशेषतः गेल्या तीन महिन्यांपासून ‘जीएसटी’तून मिळणारा महसूल अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत देत आहे. त्याचवेळी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतावर विश्‍वास दाखविला असून याचा फार मोठा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. परकीय गंगाजळीच्या आघाडीवर भारताने रशियाला मागे टाकल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात विदेशी संस्थागत गुंतवणूक सुमारे २५ हजार ७८७ कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचवेळी देशाची परकीय गंगाजळी ५९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. या गोष्टी भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेत असल्याचे दाखवून देत आहे, असे सांगून अनुराग ठाकूर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दरम्यान, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी देखील जयपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, देश समाधानकारक वेगाने आर्थिक प्रगती करीत असल्याचे म्हटले आहे.

विकासदरात सातत्य राखून आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेण्याचे आव्हान यापुढे भारतासमोर असेल, असे अमिताभ कांत पुढे म्हणाले. २०२० सालात जागतिक विकासदर उणे ३.५ टक्के इतका होता. या आर्थिक वर्षात हा विकासदर ५.५ टक्क्यांवर जाईल, अशी माहिती कांत यांनी दिली. मात्र भारतीय अर्थव्यवस्था याच्या दुपटीपेक्षा अधिक वेगाने प्रगती करणार असल्याचे भाकित आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी जगाची फॅक्टरी अशी ओळख बनलेल्या चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडू लागल्या असून या कंपन्या भारताकडे आकृष्ट होत असल्याची बाब समोर येत आहे. याचा फार मोठा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

चीनबरोबरील वाद विकोपाला गेलेल्या जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरच युरोपिय देशांनाही जागतिक पुरवठा साखळीसाठी चीनवर अवलंबून राहता येणार नाही, याची जाणीव झालेली आहे. हे स्थान घेण्याची क्षमता भारताकडे आहे व यासाठी भारताला सहाय्य करण्याची तयारी जपान व ऑस्ट्रेलियाने केली आहे. क्वाडच्या व्यासपीठाचा वापर करून हे दोन्ही देश भारताबरोबर या आघाडीवर सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात याचा फार मोठा लाभ भारताला मिळू शकेल.

leave a reply