भारतीय नौदल १० अद्ययावत ड्रोन्स खरेदी करणार

नवी दिल्ली -. हिंदी महासागर क्षेत्रात चीनी जहाजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय नौदलाकडून १० अद्यावत ड्रोन खरेदी करण्यात येणार आहेत. जलदगतीने ही ड्रोन खरेदी केली जातील आणि युद्धनौकांवर या ड्रोन्सची तैनाती करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नौदलाकडून या ‘शिपबॉर्न ड्रोन’ खरेदीच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. सध्या हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सोपविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ह्या ड्रोनची खरेदी प्रक्रिया सुरू होईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय नौदल

चीन हिंदी महासागर क्षेत्रात नौदल तळ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. नुकतेच पाकिस्तानच्या कराचीत चिनी युद्धनौका पाकिस्तानी पाणबुडीबरोबर तैनात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. गलवान येथील संघर्षानंतर भारताने हिंदी महासागरातील आपली तैनाती वाढविली आहे आणि चीनच्या हालचालींना वेसण घातले आहे. ही सज्जता आणखी बळकट करण्यासाठी आणि चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नौदलाने १० ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय नौदलाने यासंदर्भातला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला आहे. या ड्रोनसाठी १२४० कोटींपेक्षा जास्त खर्च लागणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. हे ड्रोन मोठ्या युध्दनौकांवर तैनात करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. या ड्रोनच्या समावेशामुळे चीनी युध्दनौका आणि या क्षेत्रातल्या संशयित हालचालींवर टेहळणी करणे शक्य होईल.

भारतीय नौदल अमेरिकेकडून ‘सी गार्डियन ड्रोन’ खरेदी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या अमेरिकन ड्रोनमुळे मादागास्कर ते मलाक्काच्या आखातापर्यत टेहळणी करता येणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदल आपल्या ताफ्यात असलेल्या ड्रोनचे अद्ययावतीकरण करीत आहे. या व्यतिरिक्त ही १० ड्रोन्स खरेदी केली जाणार आहेत.

leave a reply