भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गत लडाखमध्ये साऱ्या जगाने पाहिली

- लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा चीन आणि पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली – ”देशाच्या सर्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि देशाकडे डोळे वाकडे करू पाहणाऱ्यांना भारतीय सैन्याने त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपले वीर सैनिक काय करू शकतात, देश काय करू शकतो, हे लडाखमध्ये साऱ्या जगाने पहिले.”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचा नामोउल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला. दहशतवाद आणि विस्तारवाद या दोन्हींचा मुकाबला भारत करीत आहे. भारत शांती आणि सौहार्दसाठी जसा वचनबद्ध आहे, तसाच सुरक्षेसाठी तत्पर आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

लडाख

देशाच्या ७४ व्या स्वतंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या जनतेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या वीर जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले जवान काय करु शकतात, हे संपूर्ण जगाने लडाखमध्ये पहिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. एलओसीपासून एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या वीर जवानांनी त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

एलओसी ते एलएसीचा उल्लेख करून पंतप्रधानांनी चीन आणि पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. देशाकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना त्याची किंमत चुकती करावी लागेल, असा स्पष्ट इशारा यामध्ये लपला असल्याचे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. ”संरक्षण सज्जेतेसाठी आणि आपल्या संरक्षणदलांना बळकट करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे. तसेच सीमेवर आणि किनारपट्टीवर करण्यात येणार पायाभूत सुविधांचा विस्तार देशाच्या सुरक्षेसाठी फार मोठी भूमिका पार पाडत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागरातील बेटे रस्ते आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कधी झाला नव्हता इतका वेगाने विस्तार होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी ‘नॅशनल कॅडेट कोर’ (एनसीसी)चा विस्तार सीमा आणि किनारपट्टीवरील १७३ जिल्ह्यात करण्याची घोषणा केली. येत्या काही दिवसात लष्कर, वायुसेना आणि नौदल सुमारे १ लाख ‘एनसीसी’ कॅडेट्सला प्रशिक्षण देऊन तयार करेल. सीमावर्ती भागांमध्ये लष्कर या कॅडेट्सना प्रशिक्षण देईल, तर किनारपट्टी भागात नौदल आणि वायुसेनेकडून असे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे सीमा आणि किनारपट्टी भागात आपत्कालीन परिस्थिती मुकाबला करण्यासाठी देशाकडे प्रशिक्षित तरुण उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी कोरोनाव्हायरस विरोधातील देशात सुरु असलेल्या लढाईत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सॅल्यूट केला. देशात कोरोनाविरोधात तीन व्हॅक्सिन विकसित करण्यात आल्या असून त्यांचे विविध टप्पातील प्रशिक्षण सुरु आहे. संशोधकांनी संकेत देताच मोठ्या प्रमाणावर या लसींचे उत्पादन सुरु होईल. व्हॅक्सिनच्या उत्पादन आणि वितरणाचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच पुढील एक हजार दिवसात देशातील प्रत्येक गावांना ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात येईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.

दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जगभरातून शुभेच्छा संदेश आले. भारत आणि अमेरका हे ‘महान बहुविध समाज लोकशाही, जागतिक शक्ती आणि चांगले मित्र आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासून अमेरिका आणि भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी म्हटले आहे. भारताकडे गर्व करण्यासारखे भरपूर काही आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताला स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देताना दोन्ही देशांचे संबंध एकसमान मूल्य, विश्वासावर आधारलेले असल्याचे म्हटले आहे. मालदीव, नेपाळ, भूतान, श्रीलंका या शेजारी देशांनीही भारताला शुभेच्छा संदेश पाठवले.

leave a reply