गुजरातच्या किनारपट्टीजवळ ३०० कोटींच्या अमली पदार्थांसह दहा पाकिस्तानी तस्करांना अटक

Coast_guardअहमदाबाद – गुजरातच्या ओखा बंदरापासून जवळ एका पाकिस्तानी बोटीतून प्रवास करणाऱ्या १० पाकिस्तानी नागरिकांसह ३०० कोटींचे अमली पदार्थ व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. गेल्या दीड वर्षात गुजरातच्या सागरी क्षेत्रातून तटरक्षकदलाने सुमारे दोन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच या कारवाई दरम्यान ४४ पाकिस्तानी आणि सात इराणी तस्करांनाही अटक केली आहे.

गुजरात एटीएसला सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. याची सूचना तटरक्षकदलाला देण्यात आली. यानंतर संशयित हालचालींवर नजर ठेवली जात होती. सोमवारी ओखा किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या. ‘अल सोहेली’ नावाची पाकिस्तानी बोट दिसल्यानंतर तटरक्षकदलाने आपले जहाज त्या दिशेने रवाना केले. पाकिस्तानी बोटीला थांबण्याचा इशारा केला. मात्र ही बोट न थांबताच पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने फिरत असतानाच तटरक्षकदलाकडून हवेत गोळीबार करण्यात आला.

या बोटीतील दहा पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ३०० कोटी रुपये किमतीचे ४० किलोचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये सहा पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या दारुगोळ्याचा समावेश आहे.

leave a reply