भारताच्या ‘धोरणात्मक संस्कृती’वर रामायण-महाभारताचा प्रभाव असावा

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

रामायणपुणे – भगवान कृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वात मोठे राजनीतिज्ञ होते. भारताची धोरणात्मक संस्कृती रामायण आणि महाभारतावर आधारलेलीच असायला हवी. कारण आजच्या काळात राजनैतिक स्तरावर ज्या प्रमुख दहा प्रमुख धोरणात्मक पातळीवरील संकल्पना आपण पाहतो, त्या साऱ्या रामायण व महाभारतात आहेत, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देशभरातील माध्यमांमध्ये खळबळ उडविली. आपण केलेल्या दाव्यांचे दाखले देणारे रामायण व महाभारतातील संदर्भ देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले. ‘द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज्‌‍ फॉर ॲन अनसर्टन वर्ल्ड’ या आपल्याच पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन सोहळ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते.

‘भारत मार्ग’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी पुण्यात पार पडला. यावेळी बोलताना जयशंकर यांनी देशाच्या धोरणात्मक पातळीवरील वाटचालीवर रामायण व महाभारताचा प्रभाव असायलाच हवा, असे ठासून सांगितले. ‘मला विचाराल तर भगवान कृष्ण व हनुमंत हे जगातील सर्वात मोठे राजनीतिज्ञ असल्याचे वाटते. हनुमंतांनी तर राजनीतिच्याही पलिकडे जाऊन लंकेची पाहणी केली, लंकेचे दहन देखील केले, सीतामातेची प्रत्यक्ष भेट घेतली. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करणारे हनुमंत हे ‘मल्टीपर्पज्‌‍ डिप्लोमॅट’ होते, असा दावा जयशंकर यांनी केला.

सध्या जगात ज्या काही दहा प्रमुख धोरणात्मक पातळीवरील संकल्पना आहेत, त्या साऱ्या रामायण व महाभारतात आपल्याला सापडतात, असे सांगून जयशंकर यांनी या महाकाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. भगवान कृष्णांनी ‘स्ट्रॅटेजिक पेशन्स’ अर्थात धोरणात्मक संयमाचे उत्कृष्ट उदाहरण शिशुपालाच्या बाबतीत दाखवून दिले. शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंत भगवान कृष्णांनी त्याला माफ केले. पण 101व्या अपराधानंतर भगवान कृष्णांनी शिशुपालाला संपविले. योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याचा धडा यातून मिळतो, असे जयशंकर पुढे म्हणाले. त्याचवेळी महाभारतातील कुरूक्षेत्रात जसे कौरव व पांडव एकमेकांसमोर युद्धासाठी खडे ठाकले होते, तसेच त्या युद्धात तटस्थ राहणारेही काहीजण होते, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

तर दुर्योधन आणि कर्णाचे एकत्र येणे घातक होते व त्यांनी नियमावर आधारलेल्या व्यवस्थेचे उल्लंघन केले. आयुष्यभर नियम पायदळी तुडविणाऱ्या या दोघांनी आपल्या अखेरच्या काळात मात्र इतरांनी नियम पाळावे, असे वाटत होते. पण तसे न करता या दोघांनाही संपवावे लागले. दोन वाईट शक्तींमधील सहकार्य अखेरीस त्यांचा समुदाय व जगासाठीही घातकच ठरते, असे सूचक उद्गार काढून जयशंकर यांनी फार मोठा संदेश दिल्याचे दिसत आहे.

थेट उल्लेख केलेला नसला, तरी दुर्योधन व कर्णाचा जयशंकर यांनी दिलेला दाखला पाकिस्तान व चीनशी जोडलेला असल्याचे संकेत मिळत आहेत. तर भगवान कृष्णांच्या धोरणात्मक संयमाचा दाखला देताना देखील जयशंकर यांनी भारताने पाकिस्तानबाबत दाखविलेल्या संयमाची आठवण करून दिल्याचे दिसते. सध्या पाकिस्तानची शंभरी भरत आल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून लवकरच या देशाच्या चिरफळ्या उडण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. अशा काळात भारताला पाकिस्तानची गय करून चालणार नाही आणि भारत तसे करणार देखील नाही, असे दिसू लागले आहे. तसेच आपल्याच नातेवाईकांच्या विरोधात युद्ध करताना अर्जुनासारखा योद्धा भावनाविवश झाला होता, याचीही आठवण जयशंकर यांनी करून दिली. आपल्याला आपले नातेवाईक आणि शेजारी देखील निवडता येत नाहीत, असे सांगून अर्जुनाच्या संभ्रमावस्थेचा सध्याच्या काळातील भारताच्या स्थितीशी संबंध जयशंकर यांनी जोडला. मात्र भावनेच्या भरात येऊन आपल्याला निर्णय घेता येणार नाही, अर्जुनालाही तसे करणे शक्य झाले नव्हते, असा आणखी एक महत्त्वाचा संदेश जयशंकर यांनी देशवासियांना दिला आहे.

हिंदी

leave a reply