संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष भारताच्या भेटीवर

आमसभेचे अध्यक्षनवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष साबा कोरोसी तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रसंघाच्या 77 व्या आमसभेचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या कोरोसी यांचा हा पहिलाच दौरा असून यासाठी त्यांनी भारताची निवड केली, याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले. तर भारतात दाखल होण्यापूर्वी कोसोसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सध्याच्या जगाचे प्रतिबिंब पडलेले नाही, असे परखड उद्गार काढले आहेत. भारताने देखील ही बाब वारंवार लक्षात आणून देऊन सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्त्वासाठी दावा केला होता. त्यामुळे कोरोसी यांनी भारताचीच भूमिका मांडल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर मोठ्या अपक्षेने आपण भारताच्या भेटीवर येत असल्याचे कोरोसी यांनी म्हटले आहे.

हंगेरीचे माजी राजनैतिक अधिकारी असलेल्या व सप्टेंबर महिन्यात राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष बनलेल्या कोरोसी यांच्या या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कोरोसी यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी कोरोसी यांनी भारताची निवड करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचे महत्त्व अधोरेखित केल्याचे दिसते. भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चे नेतृत्त्व करणारा देश असल्याचे सांगून कोरोसी यांनी भारताची प्रशंसा केली आहे. इतकेच नाही तर भारताचा धोरणात्मक दृष्टीकोन व संयुक्त राष्ट्रसंघाची धेयधोरणे परस्परांना पूरक असल्याचा दावा यावेळी कोरोसी यांनी केला.

जग कसे असावे, याबाबतचे भारताचे विचार आणि संयुक्त राष्ट्रसंघाची धोरणे यात साधर्म्य आहे. सध्या आपल्यासमोर खड्या ठाकलेल्या समस्यां सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. पण थोड्याफार फरकाने या समस्या साऱ्या जगाला भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत भारत आपल्या समस्या सोडविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा जगालाही लाभ मिळाल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास कोरोसी यांनी व्यक्त केला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये साऱ्या जगाचे प्रतिबिंब पडत नाही, सध्याच्या काळात याची प्रकर्षाने जाणीव होत असल्याची बाब कोरोसी यांनी लक्षात आणून दिली. सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेले देशच इतर देशांवर हल्ले चढवित आहेत, असा टोला कोरोसी यांनी लगावला.

युक्रेनचे युद्ध आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचे संकट ग्रासत असताना, भारताकडे जी20चे अध्यक्षपद आले आहे. त्यामुळे भारताच्या जी20 अध्यक्षपदासमोर फार मोठी आव्हाने खडी ठाकल्याचे दिसत आहे, अशा शब्दात कोरोसी यांनी परखड वास्तवाची जाणीव करून दिली. पण भारताने मांडलेली जी20साठी मांडलेली ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ची संकल्पना अत्यंत व्यापक असून भारत जागतिक दायित्त्वाचा विचार करीत असल्याचे यातून प्रतित होते, असे कोरोसी म्हणाले. त्यामुळे या आव्हानाचा सामना करणे भारताला शक्य होईल, असे संकेत कोरोसी यांनी दिले आहेत.

हिंदी

leave a reply