लडाखमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी जवानांशी भारतीय सैनिकांची चकमक

नवी दिल्ली – लडाखच्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील माघारीबाबत भारत आणि चीनच्या अधिकार्‍यांमध्ये वाटाघाटी सुरू असताना २९ – ३० ऑगस्टच्या रात्री चिनी जवानांनी ही आगळीक केली. ही घुसखोरी करुन भारतावर दबाव टाकण्याचा चीनचा कुटील हेतू होता. पण चीनचा हा कावा वेळीच लक्षात आल्याने भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना रोखले. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचे तपशील उघड झालेले नाहीत. चीननेही अधिकृत पातळीवर हा संघर्ष झाल्याचे मान्य केले, मात्र भारतीय सैनिकांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा कांगावा चीनने केला आहे.

घुसखोरी

भारतीय संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सकाळी “ईस्टर्न लडाख“मधील परिस्थितीबाबत पत्रक प्रसिद्ध केले. भारताबरोबरच्या राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटींचा चीनने गैरफायदा घेतल्याचा आरोप भारतीय लष्कराने केला. या वाटाघाटी सुरू असताना, चीनच्या जवानांनी लडाखच्या पूर्वेकडील पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनार्‍याजवळच्या भागात घुसखोरी करुन ‘स्टेटस को’ अर्थात स्थिती बदलण्याचा डाव आखला होता. पण या भागात आधीच सज्ज असलेल्या भारतीय सैनिकांनी कारवाई करुन चिनी जवानांचा डाव पुन्हा एकदा उधळून लावल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. वाटाघाटींच्या मार्फत सदर भागात शांती व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारतीय लष्कर प्रयत्‍नशील आहे. पण त्याचबरोबर देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी लष्कर वचनबद्ध असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या घटनेनंतर भारतीय लष्कराने पँगाँग सरोवराच्या सर्व भागातील तैनाती व गस्त अधिकच वाढविली आहे.

घुसखोरी

पँगाँगमधील या चकमकीत भारतीय सैनिकांनी चीनच्या काही जवानांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जातो. मात्र या दाव्याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही. तसेच या संघर्षात भारतीय व चिनी लष्कराची नक्की किती हानी झाली व हा संघर्ष कुठल्या स्वरुपाचा होता, याचीही माहिती दोन्ही देशांनी उघड केलेली नाही. पण घुसखोरीचा डाव हाणून पाडून भारतीय लष्कराने चीनला मोठा दणका दिल्याचे दावे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी, चीनला लष्करी प्रत्युत्तर द्यावेच लागेल, त्याखेरीज या देशाला शहाणपण येणार नाही, असे काही माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

चीनबरोबरील सीमावाद वाटाघाटीने सुटला नाही तर, भारतासमोर लष्करी कारवाईचा पर्याय आहे, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देण्याचे चीनने टाळले असले तरी, घुसखोरी करुन चीन भारतावरील लष्करी दबाव वाढवू पाहत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन माघार घेण्यास तयार नसलेल्या चीनला अद्द्ल घडविण्यासाठी भारताने काही आक्रमक पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाची युद्धनौका साऊथ चायना सी’मध्ये तैनात करण्यात आली आहे. याचा चीनवर फार मोठा परिणाम झाला असून सीमावादावरील चर्चेतही चीनने हा मुद्दा उपस्थित केल्याचे दावे केले जातात. म्हणूनच बिथरलेल्या चीनने घुसखोरीचा प्रयत्न करुन पाहिला असावा, अशी दाट शक्यता माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र, या आगळीकीचे भयंकर परिणाम चीनला भोगावे लागतील, भारतीय संरक्षणदलांनी त्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी ठासून सांगत आहेत.

leave a reply