चीन व पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारताची वायुसेना समर्थ

- वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेने कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची पूर्ण सज्जता ठेवलेली आहे. एकचवेळी चीन आणि पाकिस्तान, अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्षासाठी वायुसेना सिद्ध आहे आणि यासाठी आवश्यक असलेली तैनातीही वायुसेनेने केलेली आहे. ‘एलएसी’वर चिनी हवाईदलापेक्षाही भारतीय वायुसेनाची क्षमता खूपच अधिक आहे. तरीही शत्रूला कमी लेखण्याची चूक वायुसेना करणार नाही, अशा खणखणीत शब्दात वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी भारताविरोधात हातमिळवणी करणार्‍या चीनसह पाकिस्तानलाही निर्णायक इशारा दिला.

वायुसेना

काही दिवसांपूर्वीच मनालीपासून लेहपर्यंतचे अंतर सुमारे ४५ किलोमीटरने कमी करणार्‍या ‘अटल टनेल’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन झाले होते. या टनेलमुळे मनाली व लेह सर्वच हवामानात एकमेकांशी जोडलेले राहतील व यामुळेच अटल टनेलला सामरिक महत्व आले आहे. भारतीय सैन्य व रणगाड्यांचीही वाहतूक या मार्गाने होऊ शकते आणि चीनलगतच्या सीमेवर जलद गतीने लष्करी हालचाली करणे, अटल टनेलमुळे भारताला शक्य होणार आहे, ही बाब चीनला चांगलीच झोंबलेली आहे. म्हणूनच चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने अटल टनेलवरुन भारताला धमकी दिली.

शांततेच्या काळात अटल टनेला वापर भारत जरूर करू शकेल. पण युद्धाच्या काळात अशा टनेला वापर करण्याची स्वप्ने भारताने पाहू नयेत. कारण युद्ध पेटल्यास चीन पहिल्यांदा अटल टनेललाच लक्ष्य करील आणि भारताला त्याचा वापर करू देणार नाही, अशा बढाया ग्लोबल टाईम्सने मारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीनने अधिकृत पातळीवर भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका न घेता ग्लोबल टाईम्स मार्फत भारताला धमक्या देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. म्हणूनच चीनच्या या मुखपत्राला भारताने अधिकृत पातळीवर सडेतोड उत्तर देणे आवश्यक बनले होते. भारताचे वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वायुसेना देशाच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज असल्याची ग्वाही दिली. तसेच लडाखच्या क्षेत्रात भारतीय वायुसेनेवर मात करण्याची क्षमता चीनकडे नाही, असे थेट शब्दात सांगून वायुसेनाप्रमुखांनी चीनचा नक्शा उतरविला आहे. असे असले तरी शत्रूला कमी लेखून गाफील राहण्याची चूक वायुसेना करणार नाही, असेही वायुसेनाप्रमुखांनी देशाला आश्वस्त केले आहे. वायुसेना एकाचवेळी चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर देशाचे संरक्षण करण्यासाठी समर्थ असून याकरीता आवश्यक असलेली तैनातीही वायुसेनेने आधीच करुन ठेवली आहे, असे सूचक उद्‍गार वायुसेनाप्रमुखांनी काढले आहेत.

वायुसेना

भारतीय वायुसेनेतील रफायलच्या समावेशामुळे शत्रूदेशात अधिक खोलवर मारा करण्याची क्षमता वायुसेनेने प्राप्त केलेली आहे. यामुळे पहिल्यांदाच हल्ला चढवून वायुसेनेला शत्रूला नेस्तनाबूत करू शकते, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. त्याचवेळी पुढच्या काळात वायुसेनेत आणखी काही रफायल विमानांचा समावेश करण्याची प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत वायुसेनाप्रमुखांनी दिले आहेत. सामरिक विश्लेषक देखील भारताने रफायलसारखी अतिप्रगत विमाने खरेदी करुन वायुसेनेला भासत असलेल्या लढाऊ विमानांच्या काही स्क्वाड्र्नची कमतरता भरुन काढावी, असा सल्ला देत आहेत. रफायलची निर्मिती करणार्‍या फ्रान्सच्या डॅसाल्ट कंपनीने देखील पुढची रफायल विमाने भारताला अधिक स्वस्त व जलदगतीने पुरविता येतील, असा आकर्षिक प्रस्ताव दिला होता.

ग्लोबल टाईम्समार्फत भारताला युद्धाच्या धमक्या देणार्‍या चीनला जरब बसविण्यासाठी भारत सज्ज आहे, असा संदेश वायुसेनाप्रमुखांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनबाबतची भारताची भूमिका अधिकाधिक स्पष्ट, थेट आणि नेमकी बनत चालली आहे. याआधी चीनबाबत बोलताना भारतीय नेते आणि संरक्षणदलांचे अधिकारी संयमी भाषेचा वापर करीत होते. पण आता मात्र चीनला कळेल, अशी भाषा वापरुन आणि कारवाई करुन भारत चीनला प्रत्युत्तर देत आहे. भारताच्या या आक्रमकतेमुळे चीनला धक्का बसला असून या धक्क्यातून चीन अद्याप सावरलेला नाही, असे चीनचा अभ्यास करणार्‍या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply