सौदी व अरब देशांनी तुर्कीवर संपूर्ण बहिष्कार टाकावा

- सौदीच्या अधिकार्‍यांचे आवाहन

रियाध – सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांवर जहरी टीका करणार्‍या तुर्कीला आर्थिक झटका देण्याचे संकेत सौदीने दिले आहेत. तुर्कीतून होणारी उत्पादनांची निर्यात, गुंतवणूक त्याचबरोबर तुर्कीबरोबरचे पर्यटन यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. जे काही तुर्कीचे आहे, ते सारे बहिष्कृत करा. तुर्कीवर बहिष्कार टाकणे हे सौदीच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन सौदी अरेबियाच्या ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ने केले. काही दिवसांपूर्वी तुर्कीने आखातातील अस्थैर्याला सौदी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर सौदीतून ही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

बहिष्कार

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांना इस्लामी देशांचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वाकांक्षा असून यासाठी ते पाकिस्तान, अझरबैझान, मलेशिया अशा देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्यात तुर्कीच्या संसदेतील भाषणात सौदी अरेबिया व आखातातील इतर देशांवर टीका करुन राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले. ‘आखातातील काही देश तुर्कीला जाणूनबुजून लक्ष्य करीत आहेत. या देशांच्या चुकीच्या धोरणामुळेच आखातात अस्थैर्य निर्माण झाले आहे. पण जे देश तुर्कीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत, अशा देशांचे अस्तित्वही नव्हते आणि भविष्यातही या देशांना स्थान नसेल. पण पुढच्या काळात तुर्कीचा राष्ट्रध्वज मात्र या क्षेत्रात सतत फडकत राहील’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केली.

तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या या विधानांवर सौदीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सौदीच्या ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ‘अजलान अल-अजलान’ यांनी तुर्कीवर सर्वंकष बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. सौदी नेतृत्त्व, सौदी आणि सौदीच्या जनतेच्या विरोधात गरळ ओकणार्‍या तुर्कीला यापुढे उत्तर द्यावेच लागेल, असे अजलान यांनी सांगितले. अजलान यांच्या या आवाहनाला सौदी तसेच शेजारी अरब देशांमधील जनतेकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जातो. दोन महिन्यांपूर्वी सौदीच्या व्यापारी गटाने तुर्कीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे इराकमार्गे सौदीत दाखल होणारे तुर्कीचे अनेक ट्रक्स सीमेवर अडकून पडले होते. त्यातच सौदीने पुकारलेला हा तुर्कीवरील बहिष्कार यशस्वी ठरला तर त्याचा परिणाम तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तविली जाते.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन इस्लामी जगताचे नेतृत्त्व करण्याची स्वप्ने पाहत आहेत. यासाठी त्यांनी इस्रायल व भारतासारख्या देशांच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे आणि अरब-इस्लामी देशांमधील सौदीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सौदीकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक ठरते. पुढच्या काळात तुर्की आणि सौदीमध्ये तणाव अधिकच वाढून दोन्ही देशांचे संबंध विकोपाला जाण्याची दाट शक्यता यामुळे समोर येत आहे.

leave a reply