चीन-पाकिस्तानच्या आघाड्यांवर एकाच वेळी संघर्षासाठी भारताची वायुसेना समर्थ

-वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) ‘रफायल’ विमानांच्या घिरट्या चीनला खरमरीत संदेश देत आहेत. रफायलबरोबरच ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ तसेच ‘सी-१३०जे सुपर हर्क्युलिस’ या अवजड वाहतूक करणार्‍या विमानांच्या फार मोठ्या हालचाली ‘एलएसी’वर दिसू लागल्या आहेत. भारतीय वायुसेनेकडे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर दिवसा आणि रात्रीही मोहीम फत्ते करुन दाखविण्याचे सामर्थ्य भारतीय वायुसेनेकडे आहे, असा इशारा वायुसेनेच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. त्याचवेळी लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या लष्कराची जुंपलेली असताना, हिंदी महासागरात भारतीय नौदल वर्चस्व गाजवून चीनची व्यापारी वाहतूक बंद पाडू शकतो, असे भारताचे माजी नौदलप्रमुख अरूण प्रकाश यांनी लक्षात आणून दिले आहे. चीनच्या आगळीकीला भारत घणाघाती प्रत्युत्तर देईल याची जाणीव वेगवेगळ्या मार्गाने चीनला करुन दिली जात असल्याचे यामुळे समोर येत आहे.

वायुसेना

ब्रिगेडिअर स्तरावरील चर्चेच्या सहाव्या फेरीत भारत आणि चीनने लडाखच्या ‘एलएसी’वरील तणावात अधिक भर न टाकण्याचे मान्य केले होते. पण चीन भारतीय सैन्याने या ठिकाणाहून माघार घ्यावी, या मागणीवर अडून बसला आहे. तर आधी घुसखोरी करणार्‍या देशाने अर्थात चीनने आपले जवान आधी मागे घ्यावेत, अशी भारताची ठाम भूमिका आहे. त्याचवेळी चीनने आपली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नक्की कुठून कुठपर्यंत आहे, ते एकदाचे स्पष्ट करावे, अशीही कणखर भूमिका भारताने घेतली आहे. यावर चर्चा करायला चीन तयार नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत निश्चित आखणी न करता भारताच्या अधिकाधिक भूभागावर दावा सांगून बळकाविण्याचे चीनचे आजवरचे धोरण होते. त्यामुळे भारताकडून केली जाणारी ही मागणी मान्य करणे चीनला अडचणीत टाकणारी ठरते.

मात्र, लडाखच्याच नाही तर चीनबरोबरच्या संपूर्ण ‘एलएसी’बाबत चर्चा करण्यास भारत तयार आहे आणि चीनने सीमावाद सोडविण्यासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, यावर भारताने विशेष जोर दिला आहे. याच कारणामुळे सीमावादावरील चर्चेत भारतावर दडपण टाकण्याचे चीनचे डाव उलटे पडत आहेत. भारताची आडमुठी भूमिका सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी मारक ठरत असल्याचा कांगावा चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाईम्सने केला आहे. त्याचवेळी ‘एलएसी’ नजिकच्या लडाखमधील क्षेत्रात लाईव्ह फायरींग युद्धसरावाचे आयोजन करुन चीन भारताला भीषण परिणामांच्या धमक्या ग्लोबल टाईम्समार्फत देत आहे. याबरोबरच पाकिस्तानी लष्कर व हवाईदलाच्या काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील हालचाली वाढल्या असून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आपल्या जवानांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. भारताला एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध करावे लागेल, असे इशारे चीन व पाकिस्तानकडून दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने आपल्या सज्जतेची या दोन्ही देशांना परखड जाणीव करुन दिली आहे.

वायुसेनाभारतीय वायुसेनेचे सामर्थ्य इतके वाढले आहे की, एकाचवेळी चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर दिवसा व रात्री कुठलीही मोहीम फत्ते करता येईल. चीन व पाकिस्तानच्या सीमेपासून भारतीय वायुसेनेचे तळ खूपच जवळ आहेत. त्यामुळे अशा मोहिमा यशस्वी करुन दाखविणे वायुसेनेला सोपे जाईल, असे या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. तर भारताचे माजी नौदलप्रमुख अरूण प्रकाश यांनीही चीनला वास्तवाचे भान करुन देणारी विधाने केली आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल चीनची मालवाहतूक पूर्णपणे बंद पाडू शकेल आणि चीनला जेरीस आणता येईल, असा दावा माजी नौदलप्रमुखांनी केला. १९७१ सालच्या बांगलादेश युद्धात भारतीय नौदलाचे नेतृत्त्व करणार्‍या अरूण प्रकाश यांनी दिलेला हा इशारा चीनचा थरकाप उडविणारा आहे.

वायुसेना

सध्या तरी, चीन भारताबरोबर युद्ध छेडण्यास तयार नसल्याचे वरकरणी दिसत असले, तरी या देशावर कधीही विश्वास ठेवता येऊ शकत नाही, याची जाणीव भारताला झालेली आहे. त्याचवेळी लडाखमधील संघर्षात भारतासमोर आपण झुकल्याचे चित्र उभे राहू नये म्हणून चीनचा आटापिटा सुरू आहे. अशा परिस्थितीत चीनच्या धमक्या आणि युद्धखोरीचे इशारे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन भारत चीनच्या नेतृत्त्वाची कोंडी करीत आहे. चीनला कुठल्याही परिस्थितीत सवलत देण्याची घोडचूक भारताने करता कामा नये, असे निरिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या भारत ह्याच आक्रमक डावपेचांवर काम करीत आहे. त्याल तोंड देताना चीनची भांबेरी उडत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply