चिनी ॲप्सवरील भारताची बंदी नियमांचा भंग करणारी

- चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांचा दावा

नियमांचा भंगनवी दिल्ली – भारताने आणखी 43 चिनी ॲप्सवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमांची आठवण झाली आहे. भारताने टाकलेली ही बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचा भंग करणारी असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारतातील चीनच्या दूतावासाच्या प्रवक्त्या जी रोंग यांनी भारताने ‘डब्ल्यूटीओ’च्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आजवर सर्वच व्यापारी नियम व कायदे धाब्यावर बसवून भारताला व्यापारी सवलती नाकारणाऱ्या चीनने केलेले हे दावे हास्यास्पद ठरत आहेत.

भारत राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून चीनच्या ॲप्सवर बंदी टाकत आहे. भारताने तसे न करता ‘डब्ल्यूटीओ’च्या नियमांचे पालन करावे व ही बंदी मागे घ्यावे, असे आवाहन जी रोंग यांनी केले. तसेच भारत या चीनसह सर्वच देशांना योग्य ती व्यापारी संधी देऊन ‘डब्ल्यूटीओ’च्या नियमांचे पालन करील, अशी आपली अपेक्षा असल्याचे रोंग म्हणाल्या. तसेच चीनच्या ॲप्सपासून भारताच्या सुरक्षेला धोका नसल्याचा निर्वाळा रोंग यांनी दिला आहे. भारत आणि चीन यांच्यातील व्यापार एकमेकांना फार मोठी संधी उपलब्ध करून देणारा असून या व्यवहारात दोन्ही देशांचा लाभ होईल, असे दावे रोंग यांनी केले आहेत.

नियमांचा भंग

भारत आणि चीनमधील व्यापारी संबंध पूर्ववत व्हावे, अशी मागणीही यावेळी रोंग यांनी केली आहे. प्रत्यक्षात भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापारात चीन फार मोठा लाभ उकळत आला आहे. भारताच्या मोठ्या बाजारपेठेचा लाभ घेऊन चीनने दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई केली खरी. पण भारताच्या कृषी, औषधनिर्मिती तसेच आयटी क्षेत्राला आपल्या देशात संधी देण्याचे चीनने नेहमीच नाकारले होते. यामुळे दरवर्षी भारत व चीनमधील व्यापारी तूट वाढत गेली. वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही चीनने भारताला कुठल्याही प्रकारची व्यापारी सवलत देण्याचे नाकारले होते.

लडाखच्या एलएसीवरील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर हल्ला चढविणाऱ्या चीनच्या विरोधात भारताने पहिल्यांदाच आक्रमक कारवाई केली होती. यानुसार आत्तापर्यंत चीनच्या 267 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे चिनी कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तसेच दिवाळीत चिनी उत्पादनांनी भरून जाणारी भारतीय बाजारपेठ यावर्षी मात्र स्थानिक उत्पादनांनी भरलेली होती. यामुळे चीनला हजारो कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा केला जातो.

भारताकडून अशारितीने आपल्याविरोधात निर्णय घेतले जातील, अशी चीनची अपेक्षा नव्हती. त्यामुळे भारताला ‘डब्ल्यूटीओ’मध्ये तक्रारी नोंदविण्याच्या धमक्या व व्यापारी संबंध पुर्ववत करण्यासाठी चीनकडून आवाहन केले जात आहे. या दोन्हीचा भारतावर परिणाम होण्याची अजिबात शक्यता नाही. पुढच्या काळातही भारत चीनच्या विरोधात आक्रमक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply