भारत 26/11चा हल्ला कधीही विसरणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/अबू धाबी/न्यूयॉर्क – पाकिस्तानने धाडलेल्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या ‘26/11’च्या हल्ल्याची जखम भारत कधीही विसरणार नाही. आजच्या भारत दहशतवादाचा नव्या नीती आणि नव्या रितीने मुकाबला करीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या हल्ल्याच्या 12 व्या स्मरणदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी बोलत होते. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशाचे सुरक्षातंत्र मजबूत झाले असून असा दहशतवादी हल्ला पुन्हा घडविता येणे जवळपास अशक्य कोटीतली बाब बनल्याचा निर्वाळा दिला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख टाळून, भारत पुढच्या काळात जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशावरील करडी नजर जराही ढळू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

26/11चा हल्ला

26/11 च्या हल्ल्याला 12 वर्षे झाली असून अजूनही देश हा दहशतवादी हल्ला विसरलेला नाही, असा संदेश भारताच्या नेतृत्त्वाकडून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना, हा दहशतवादी हल्ला देश कधीही विसरणार नाही, असे बजावले आहे. पाकिस्तानातून धाडलेल्या दहशतवादी हल्ल्याची जखम न विसरता येण्याजोगी आहे. मात्र आजच्या भारताने दहशतवादाच्या विरोधात नवी नीती आणि नवी रिती स्वीकारली असून देश समर्थपणे दहशतवादाचा मुकाबला करीत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. तसेच दहशतवाद्यांची कटकारस्थाने हाणून पाडणाऱ्या देशाच्या सुरक्षा दलांची पंतप्रधानांनी यावेळी प्रशंसा केली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशाच्या भक्कम सुरक्षाचक्रामुळे 26/11 सारखा दुसरा हल्ला होऊ शकणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी असा हल्ला चढविण्याच्या इराद्याने सीमेपलिकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या जवानांनी नागरोटा येथे ठार केले आणि पाकिस्तानचे कारस्थान उधळले, याचा दाखला संरक्षणमंत्र्यांनी दिला. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच शत्रू सीमेवरून घुसखोरी घडवून भारतात अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न करीत आला आहे. पण आता पाकिस्तानची ही सारी कारस्थाने उधळण्यात येत आहेत. 1999 सालचे कारगिल, 2017 सालचा उरी आणि 2019 सालचा पुलवामाचा हल्ला पाकिस्ताननेच घडविला होता, याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले.

संयुक्त अरब अमिरात, बाहरिन या आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही थेट नामोल्लेख न करता पाकिस्तानला फटकारले आहे. ‘जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशावरून भारत आपली करडी नजर जराही ढळू देणार नाही’, असे जयशंकर यांनी बजावले आहे. तर अमेरिकेतील भारताचे वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानने 26/11च्या सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही 26/11च्या सूत्रधारांवर पाकिस्तानने कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच अमेरिकेचा या आघाडीवर भारताला संपूर्ण पाठिंबा असेल, अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात आपले नागरिक गमावणाऱ्या इस्रायलने देखील या हल्ल्यातील बळींना न्याय मिळायलाच हवा, असे आवाहन केले आहे.

leave a reply