भारताचे रशियाबरोबरील सहकार्य महत्त्वाचे ठरेल

भारतातील रशियन राजदूतांचा विश्वास

ApNewsroom_South_Africa_Russiaनवी दिल्ली – भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘भारत म्हणजे पॉवरहाऊस’ असल्याचे म्हटले होते. अशा देशाला कुणीही सूचना देऊ शकत नाही, असा दावा करून पुतिन यांनी भारताची प्रशंसा केली. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी देखील भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. तर आता रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील रशियाचे भारताबरोबरील सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनच्या युद्धाच्या मुद्यावर पुन्हा एकदा भारतावरील दडपण वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये किंवा अमेरिकेने लादलेल्या प्राईस कॅपचे उल्लंघन न करता रशियाकडून इंधन खरेदी करावे, अशी मागणी अमेरिका करीत आहे. पाश्चिमात्य देश अमेरिकेची मागणी उचलून धरत असून पाश्चिमात्य माध्यमांनीही या प्रकरणी भारताच्या नेतृत्त्वावरील दबाव वाढविण्याची तयारी केली आहे. पण या दडपणाचा प्रभाव भारतावर पडू शकत नाही, असे रशियाचे म्हणणे आहे.

denis alipovभारताने रशियाकडून प्रचंड प्रमाणात इंधनाची खरेदी सुरू केली असून यात वाढ होताना दिसत आहे. रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा निर्णय घेतला असून भारतीय इंधनकंपन्या याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. यामुळे रशियाच्या इंधनाव्यवहारांवर निर्बंध लादण्याचे अमेरिका व पाश्चिमात्य देशांचे प्र्रयत्न अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर, रशियाकडून भारताची सातत्याने प्रशंसा होत आहे. रशियाकडून इंधनाची खरेदी करण्यासाठी भारताने पाश्चिमात्यांची नाराजी पत्करल्याचे दावे भारतीय विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याची जाणीव साऱ्या जगाला झाली, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

युक्रेनच्या युद्धात भारताने स्वीकारलेल्या तटस्थ धोरणाचे पडसाद जगभरात उमटले असून आखाती देशांपासून ते आफ्रिकन देशांनी देखील युक्रेनच्या युद्धात भारतासारखीच भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. म्हणूनच अमेरिका आपल्या प्रभावाचा वापर करून भारताला रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी पुन्हा पुन्हा धडपड करीत आहे. अशा परिस्थितीत भारत हा आपला सर्वात जवळचा सहकारी देश असल्याचे संदेश रशिया सातत्याने देत आहे. भारताबरोबरील रशियाचे सहकार्य भक्कम आहे, पण बदलत्या जागतिक परिस्थितीची मागणी लक्षात घेता या सहकार्याची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे रशियन राजदूत अलीपोव्ह यांनी म्हटले आहे.

leave a reply