युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी रशियाला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

Ukraine's warमॉस्को – कोरोनाच्या साथीमुळे जगासमोर खड्या ठाकलेल्या संकटानंतर, युक्रेनच्या युद्धाचे गंभीर परिणाम जगाला सहन करावे लागत आहेत. विशेषतः ‘ग्लोबल साऊथ’ अर्थात दक्षिणेकडील देशांवर याचे विपरित परिणाम होत आहेत, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युक्रेनचे युद्ध थांबवून राजनैतिक वाटाघाटी सुरू करण्याचे आवाहन रशियाला केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा युद्धाचा काळ नाही, असा सल्ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिला होता. त्याचीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना आठवण करून दिली. त्याचवेळी भारत व रशियाची भागीदारी काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली असून कित्येक दशके ही भागीदारी स्थीर राहिली आहे, याचा उल्लेख परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

सोमवारपासून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा रशिया दौरा सुरू झाला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेची सुरूवातच युक्रेनच्या समस्येने झाली. कोरोनाच्या साथीमुळे जगासमोर भीषण संकट खडे ठाकले होते. या संकटातून जग सावरत असतानाच, युक्रेनचे युद्ध सुरू झाले. आत्ताचे जग परस्परावलंबी आहे आणि एका ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाचे विपरित परिणाम इतरांना सहन करावेच लागतात. रशिया-युक्रेन युद्धाचे सर्वाधिक भीषण परिणाम ‘ग्लोबल साऊथ’ अर्थात जगाच्या दक्षिणेकडील देशांना सहन करावे लागत आहेत, याची जाणीव यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

म्हणूनच युक्रेनचे युद्ध थांबवून रशियाने राजनैतिक वाटाघाटी सुरू कराव्या, अशी भारताची मागणी असल्याचे जयशंकर या चर्चेत म्हणाले. भारत शांततेच्या बाजूने असल्याचेही यावेळी जयशंकर यांनी पुन्हा एकदा लक्षात आणून दिले. याबरोबरच युक्रेनच्या युद्धामुळ सुरू झालेल्या अन्नधान्य आणि खतांच्या वाहतुकीसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी भारत पुढाकार घ्यायला तयार आहे, असा प्रस्ताव देखील यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला संभवणारे धोके नक्कीच कमी होतील, असा विश्वास परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र रशियाला युक्रेनच्या युद्धाबाबत आवाहन करीत असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाबरोबरील भारताच्या मैत्रीपूर्ण सहकार्याचा दाखला दिला.

कित्येक दशकांपासून भारत व रशियाचे संबंध स्थीर आहेत आणि दोन्ही देशांची भागीदारी पुढच्या काळात अधिकाधिक प्रमाणात विकसित होईल, असा विश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी भारत व रशियामधील द्विपक्षीय व्यापार लवकरच ३० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा दावा केला आहे. याबरोबरच इंधन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही दोन्ही नेत्यांचे या चर्चेत एकमत झाले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या रशियाभेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठे महत्त्व आल्याचे दिसत आहे. भारत सातत्याने रशियाला युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे आवाहन करून चर्चेसाठी पुढाकार घेण्याची मागणी करीत आहे. याचा परिणाम लवकरच दिसू लागेल, असा दावा काही विश्लेषकांनी केला होता. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियामध्ये केलेल्या विधानांचेही महत्त्व वाढले आहे.

leave a reply