चीनबरोबरील व्यापारातील भारताची तूट 100 अब्ज डॉलर्सवर गेली

india china exportनवी दिल्ली – लडाखपासून अरुणाचलप्रदेशच्या तवांगपर्यंतच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाचा परिणाम भारत आणि चीनमधील व्यापारावर झालेला नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. भारत व चीनमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार तब्बल 135 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेला आहे. त्याचवेळी या व्यापारात भारताला सहन करावी लागणारी तूट तब्बल 100 अब्ज डॉलर्सच्याही पलिकडे गेली आहे. नुकतीच ही आकडेवारी समोर आलेली आहे.

चीन अजूनही भारताच्या बाजारपेठेचा लाभ घेत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत असून भारत व्यापारात लाभ घेऊ शकेल, अशा कृषी, औषधनिर्मिती व आयटी क्षेत्रासाठी चीन आपली बाजारपेठ भारतीय कंपन्यांकरीता खुली करण्यास तयार नाही. याचा परिणाम उभय देशांच्या व्यापारावर दिसत या व्यापारात भारताला सहन करावी लागत असलेली तूट तब्बल 100 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेली. चीन भारताला करीत असलेली निर्यात 118.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर भारतातून चीनला केली जाणारी निर्यात 17.48 अब्ज डॉर्लस इतकी असल्याचे 2022 सालची आकडेवारी सांगते.

चीन द्विपक्षीय व्यापारात भारताला सवलती द्यायला तयार नाही, मात्र भारताच्या औदार्याचा लाभ घेऊन चीन भारताच्या बाजारपेठेचा शक्य तितका फायदा घेत आहे. असे असले तरी या द्विपक्षीय व्यापारात चीनमधून भारतीय उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आधीच्या काळात चीनमधून भारताला केली जात होती, त्या प्रकारच्या उत्पादनांची निर्यात कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते. पुढच्या काळात चीनमधून आयात कमी करायची असेल, तर भारतीय उद्योगक्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल देशांतर्गत पातळीवर तयार करण्यासाठी पावले उचलावी लागतील, असे तज्ज्ञ बजावत आहेत.

चीन भारताला औषधनिर्मिती व आयटी क्षेत्रात संधी देत नसल्याने दोन्ही देशांमधील व्यापार एकतर्फी होत असल्याचा दावा केला जातो. यासाठी भारताने चीनवर दबाव टाकण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. एकदा का भारतीय कंपन्यांना चीनमधील या क्षेत्रात संधी मिळाली, तर या द्विपक्षीय व्यापाराची स्थितीगती बदलू शकते. याची जाणीव असल्याने चीन या क्षेत्रात भारताला संधीच देत नसल्याचे उघड झाले आहे. आपल्या देशात भारतात तयार होणाऱ्या कॅन्सरवरील उपाचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची मागणी असताना देखील, चीन यासाठी भारतीय कंपन्यांना आपल्या देशात प्रवेश द्यायला तयार नाही, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. याद्वारे चीन आपली भारतविरोधी भूमिका दाखवून देत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply