दीड महिन्याच्या कालावधीत चीनमध्ये कोरोनाचे 60 हजार बळी

- चीनमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 90 कोटींवर

60 हजार

बीजिंग – चीनमधील कोरोनाचा उद्रेक भयावह स्थितीत पोहोचला असून डिसेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत कोरोनाच्या साथीने चीनमध्ये जवळपास 60 हजार जणांचा बळी घेतल्याची भयंकर बाब समोर आली आहे. तर चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तब्बल 90 कोटींवर पोहोचली आहे. चीनच्या एकूण जनसंख्येपैकी सुमारे 64 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ‘पेकिंग युनिव्हर्सिटी’च्या अहवालात देण्यात आली. चीनच्या गान्सू प्रांतातील 91 टक्के लोकसंख्येला कोरोनाने ग्रासले असून युनान व किंगाई प्रांतातील 80 टक्क्यांहून अधिक जनतेला कोरोना झाल्याचे चिनी विद्यापीठाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोनाचे जवळपास साठ हजार बळी गेल्याची माहिती चीनच्याच नॅशनल हेल्थ कमिशनने जाहीर केले. शनिवारी उघड करण्यात आलेल्या या धक्कादायक माहितीमध्ये केवळ हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या रुग्णांचा समावेश आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ न शकलेल्या व घरातच दगावलेल्या कोरोनाच्या बळींचा यात समावेश नाही. अन्यथा बळींची संख्या याहूनही कितीतरी मोठी ठरू शकली असती. पण चीनच्या यंत्रणांनी ही माहिती जगासमोर येणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसते. लपवाछपवीचा प्रयत्न करूनही चीनच्या यंत्रणांना उघड करावी लागलेली कोरोनाच्या बळींची संख्या देखील जगाला हादरविण्यासाठी पुरेशी ठरू शकते.

पुढील काही आठवड्यांमध्ये चीनच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट होऊ शकतो, असा इशाराही चीनमधील आघाडीच्या वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे. गेल्याच महिन्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने चिनी जनतेच्या असंतोषाचे कारण ठरलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चीनमधील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. निर्बंध शिथिल होत असतानाच चीनमधील रुग्णसंख्येबाबत स्थानिक तसेच पाश्चिमात्य गटांकडून इशारे देण्यात आले होते.

60 हजारचीनच्या ग्वांगशी प्रांतात ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’चे प्रमुख असणाऱ्या झोऊ जिआतोंग यांनी, ‘शांघाय जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखात, 20 लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असे बजावले होतेे. त्याचवेळी चीनमधील कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या तब्बल 23 कोटींपर्यंत जाईल, असेही जिआतोंग यांनी म्हटले होते. लसीकरणाचा मंद वेग व ‘हर्ड इम्युनिटी’चा अभाव हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरतील, याची जाणीवही चिनी संशोधकांनी करून दिली होती. तर ‘एअरफिनिटी’ या ब्रिटीश गटाने कोरोना निर्बंध शिथिल केल्यास चीनमधील 13 ते 21 लाख जण दगावतील, असे बजावले होते.

पेकिंग युनिव्हर्सिटी ही चीनमधील आघाडीची शिक्षणसंस्था म्हणून ओळखण्यात येते. त्यामुळे या संस्थेच्या अहवालात चीनमध्ये कोरोनाच्या 90 कोटींहून अधिक रुग्णांची माहिती समोर येत असतानाच बळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे समोर येत आहे. ‘मॅक्सर’ या उपग्रह कंपनीने चीनच्या विविध शहरांमधील सॅटेलाईट फोटोग्राफ्स नुकतेच प्रसिद्ध केले. या फोटोग्राफ्समध्ये राजधानी बीजिंगसह शांघाय, नानजिंग, चेंगदू, कुन्मिंग या शहरातील दफनभूमींचा समावेश आहे. फोटोग्राफ्समध्ये दफनभूमींच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात चीनमधील अनेक दफनभूमींमध्ये जागा उरली नसल्याचा दावा करण्यात आला होता.

चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून(डब्ल्यूएचओ) चीनच्या यंत्रणांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारी पुरवावी, असे निर्देश वारंवार दिले जात आहेत. तर चिनी प्रवाशांना कोरोनासंदर्भातील चाचणी सक्तीची करणाऱ्या देशांमध्ये सातत्याने नवनव्या देशांची भर पडत आहे. आतापर्यंत जगातील जवळपास 20 प्रमुख देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांविरोधात कोरोनाची चाचणी व इतर निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश आहे.

leave a reply