नवी दिल्ली – शुक्रवारी ‘आर्मी डे परेड’मध्ये एकसाथ ७५ ‘स्वार्म ड्रोन्स’नी उड्डाण केले. तसेच यावेळी पार पडलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये या ड्रोन्सनी शत्रूची रणगाडे व ठिकाणे भेदून भारतीय लष्कराने आपल्या ड्रोनशक्तीचे दर्शन जगाला घडविले. भविष्यातील आधुनिक युद्धासाठी भारत सज्ज आहे, असा स्पष्ट इशारा याद्वारे शत्रूंना देण्यात आला आहे. लडाखच्या सीमेवर ताणावाचे वातावरण असताना गेल्यावर्षी चीनने एकसाथ २०० स्वार्म ड्रोन उडवून चाचण्या घेतल्या होत्या. तसेच लडाख सीमेजवळ चीनने ड्रोन्स तैनात केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ‘आर्मी डे परेड’मध्ये ‘स्वार्म ड्रोन्स’ची प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेणारी ठरत आहेत.
शुक्रवारी सकाळी ७३ व्या ‘आर्मी डे’ निमित्ताने पार पडलेल्या संचालनात भारतीय लष्कराने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मानवरहीत ७५ ड्रोन विमानांनीही या संचलनात भाग घेतला. यावर्षी प्रथमच भारतीय लष्कराने आपले ड्रोन सामर्थ्य जगासमोर आणले. यावेळी थरारक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट स्वार्म ड्रोन्सनी एकसाथ शत्रूच्या इलाक्यात कूच करीत शत्रूचे रणगाडे, धावपट्ट्या, दहशतवाद्यांचे तळ, इंधनटाक्या उद्ध्वस्त केल्या. तसेच मदरड्रोन सिस्टिमही या संचलनात सहभागी झाली होती. या मदरड्रोनमधून बाहेर पडलेल्या चार चाईल्ड ड्रोन्सनी दिलेले लक्ष्य अचूक भेदले.
भारतीय लष्कराने याद्वारे आपण ‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’साठी सज्ज झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. भविष्यातील युद्वासाठी भारतीय लष्कर तयार असून कोणतीही जोखिम न पत्करता शत्रूच्या सीमांमध्ये विध्वंस माजविण्याचे सामर्थ्य भारताकडेही आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले. आधुनिक युद्धात स्वार्म ड्रोन ऑपरेशन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. एकसाथ कितीतरी स्वार्म ड्रोन शत्रूच्या इलाक्यात प्रवेश करतात, त्यावेळी त्यांना लक्ष्य करणे कठीण असते. यामुळे शत्रूची हवाई सुरक्षा यंत्रणा भेदली जाते. तसेच हे ड्रोन एकमेकांच्या संपर्कात राहून आपल्याला दिलेले निरनिराळे लक्ष्य भेदतात. याला स्वार्म ड्रोन ऑपरेशन म्हटले जाते.
केवळ शत्रूची ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठीच नव्हे, तर शत्रूच्या प्रदेशात अडकलेल्या आपल्या सैनिकांना रसद आणि युद्ध साहित्याचा पुरवठा करण्यासाठीही स्वार्म ड्रोन अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. जगातील शक्तीशाली राष्ट्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजिन्सवर (एआय) आधारीत युद्धसाहित्यात वाढ केली आहे. गेल्यावर्षी भारतानेही संरक्षणदलांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे जाहीर केले होते. यादृष्टीने भारतीय लष्कराने संरक्षण संशोधन व विकास संस्थेसह (डीआरडीओ) स्टार्टअप कंपन्यांबरोबर काम सुरू केले होते. ‘स्वार्म ड्रोन्स’ तंत्रज्ञानावर गेल्यावर्षीच भारताने काम सुरू केले होते. तसेच ‘एआय’बरोबर क्वांटम तंत्रज्ञान, रोबोटिक्स, अल्गोरिदम वेलफेअर या आधुनिक तंत्रज्ञानावर लष्कराने काम सुरू केले आहे.