‘नो डील ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनकडून नौदलाच्या अतिरिक्त तैनातीचे संकेत

लंडन/ब्रुसेल्स – युरोपिय महासंघाबरोबर भविष्यातील संबंधांबाबत योग्य करार झाला नाही तर आक्रमक भूमिका स्वीकारण्याचे संकेत ब्रिटन सरकारने दिले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत करार झाला नाही तर ब्रिटनच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त नौदल तैनात करून युरोपिय देशांची जहाजे व नौकांचा वावर रोखला जाईल, असा इशारा ब्रिटनकडून देण्यात आला आहे. त्याचवेळी युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही, ‘इमर्जन्सी प्लॅन्स’ तयार असल्याचे जाहीर केले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, 31 जानेवारी, 2020 रोजी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर ब्रिटन व युरोपिय महासंघात भविष्यातील संबंध कसे राहतील याची चर्चा दोन्ही बाजूंमध्ये सुरू आहे. दोन्हीकडून आक्रमक वक्तव्ये सुरू असून वाटाघाटींदरम्यान सातत्याने तीव्र संघर्ष उडाल्याचे दिसून आले आहे. गेले महिनाभर ब्रिटन व युरोपिय महासंघामध्ये अनेक तातडीच्या बैठका होऊनही तोडगा समोर आलेला नाही. मात्र तीन मुद्यांवर अद्यापही एकमत न झाल्याने ब्रिटन महासंघाबरोबर करार करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून युरोपिय महासंघाच्या मुख्यालयाला भेट देऊन प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याबरोबर अनेक तास चर्चा केली होती. मात्र त्यातूनही काहीच निष्पन्न झालेले नाही. ही बैठक संपल्यानंतर पुढील 24 तासांमध्ये दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आता ‘नो डील ब्रेक्झिट’साठी तयार रहा असे स्पष्ट संकेत दिले होते. ब्रिटन व महासंघादरम्यान तीन मुद्यांवर मतभेद कायम राहिल्याचे सांगण्यात येते. त्यात ‘मासेमारीचा हक्क’, ‘उद्योग व गुंतवणुकीसाठीचे नियम’ आणि ‘वाद सोडविण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा’ यांचा समावेश आहे.

याच पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने अतिरिक्त नौदल तैनातीचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. ब्रिटन व युरोपिय देशांमध्ये मासेमारीचा मुद्दा सर्वाधिक वादाचा ठरला असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. ब्रिटनच्या सागरी हद्दीतील मासेमारीचा हक्क व वाटा फ्रान्स सोडणार नाही, असे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोणत्याही परिस्थितीत 2021 पासून ब्रिटनच्या सागरी हद्दीतील मासेमारीवर ब्रिटनचे नियंत्रण राहिल, असे बजावले आहे.

ब्रिटनच्या सागरी हद्दीतील घुसखोरी रोखण्यासाठीच ब्रिटनने इंग्लिश खाडी व आयर्लंडच्या समुद्रात गनबोट्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोटींना ब्रिटनच्या सागरी हद्दीत घुसणाऱ्या बोटींना पिटाळण्याचा तसेच ताब्यात घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. गनबोट्स बरोबरच ‘वाईल्डकॅट’ व ‘मर्लिन’ हेलिकॉप्टर्सही टेहळणीसाठी ‘स्टँडबाय’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनमधील अधिकारी तसेच नेत्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

दरम्यान, ‘नो डील ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनचे चलन असलेल्या ‘स्टर्लिंग पौंड’ची घसरण झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटनसह युरोपातील शेअरबाजारांमध्येही घसरण सुरू झाली असून पुढील आठवड्यातही ती कायम राहिल, असे संकेत देण्यात आले आहेत.

leave a reply