भारत-नेपाळच्या जवानांची सीमेवर संयुक्त गस्त

काठमांडू – भारत-नेपाळच्या सुरक्षादलांनी सीमारेषेवर संयुक्त गस्त सुरु केली आहे. नेपाळच्या कपिलवास्तु जिल्ह्यातल्या कृष्णनगर येथील सीमेवर ‘नेपाळ पोलीस’, ‘आर्म्ड पोलीस फोर्स ऑफ नेपाळ’ आणि भारताच्या ‘सीमा सुरक्षादला’चे जवान गस्तीवर आहेत. सीमेपलीकडील अवैध कारवायांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या जवानांवर आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या जवानांनी नेपाळच्या भूभागात अतिक्रमण करुन लष्करी इमारती उभारल्याची माहिती समोर येत असताना, भारत-नेपाळच्या लष्कराची सीमेवरील ही गस्त सुरू झाली आहे.

भारत-नेपाळच्या जवानांची सीमेवर संयुक्त गस्तकोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबरपर्यंत भारत-नेपाळ सीमारेषा सील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संकटाचा फायदा घेऊन अंमली पदार्थांची तस्करी व इतर अवैध कारवायांना रोखण्यासाठी भारत आणि नेपाळने सीमाभागात गस्त सुरु केली आहे. भारत आणि नेपाळचे प्रत्येकी २६ जवान तैनात या भागात तैनात आहेत. भारताने सीमासुरक्षेवर चिंता व्यक्त करुन सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नेपाळच्या पोलिसांनी म्हटले. कृष्णनगर भारत-नेपाळच्या सीमाभागातील महत्त्वाचे ठिकाण आहे. या भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवून गुन्हेगारी कारवाया रोखण्यास आपला देश वचनबद्ध असल्याचे भारताने म्हटले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमध्ये सीमावाद भडकला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सुरक्षादलांची सीमेवरील संयुक्त गस्त महत्त्वाची ठरत आहे.

भारत-नेपाळच्या जवानांची सीमेवर संयुक्त गस्तदरम्यान, चीनच्या लष्कराने नेपाळच्या सीमाभागात दोन किलोमीटर आत घुसून नऊ इमारती उभारल्या आहेत. नेपाळच्या हुमला जिल्ह्यातला भूभाग चीनने बळकाविल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर त्या ठिकाणी चिनी सैनिकांकडून नेपाळी नागरिकांना रोखले जात आहे. गावचे प्रमुख विष्णु बहादुर लामा सीमाभागात गेल्यानंतर त्यांना हे बांधकाम दिसले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण चिनी जवानांनी त्यांना हटकले. लामा यांनी या चिनी बांधकामाचे फोटोग्राफ्स काढून प्रसिद्ध केले आहेत. याआधी चीनने नेपाळच्या सात जिल्ह्यांमधील जमीन बळकविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. विकासकामाच्या आड चीन नेपाळची भूमी बळकवित असल्यचे उघड झाले होते.

leave a reply