चीनला रोखण्यासाठी नाटोचा विस्तार आवश्यक

- नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग

स्टुटगार्ट – ‘चीनच्या उदयाने जागतिक सत्तास्पर्धेचा समतोल बदलू लागला आहे. चीन आपल्या आर्थिक व राजनैतिक सामर्थ्याचा फायदा उचलून आपल्या सहकारी देशांवर तसेच खाजगी कंपन्यांवरही दडपण आणण्यास मागेपुढे पहात नाही’, या शब्दात नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी चीनच्या वाढत्या धोक्याबाबत इशारा दिला. चीनचा हा धोका रोखण्यासाठी नाटोचा विस्तार करण्याची आवश्यकता असून युरोपव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील समविचारी देशांशी सहकार्य वाढविणे महत्त्वाचे ठरेल, याकडे नाटो प्रमुखांनी लक्ष वेधले. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनला रोखण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये नाटोच्या धर्तीवर लष्करी आघाडी उभारण्याबाबत संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर नाटो प्रमुखांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

नाटोचा विस्तार

‘सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ॲनॅलिसिस’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, नाटो प्रमुखांनी चीनसंदर्भातील नाटोची भूमिका मांडली. ‘नाटोचा राजकीयदृष्ट्या अधिक प्रभावीपणे वापर करून स्पष्ट व एकत्रित राजकीय संदेश देणे उपयुक्त ठरू शकते. जागतिक पातळीवर अर्ध्याहून अधिक आर्थिक व लष्करी ताकद नाटो सदस्य देशांमध्ये एकवटली आहे. त्यामुळेच नाटोकडून देण्यात येणारा संदेश परिणामकारक व महत्वाचा ठरतो’, या शब्दात स्टॉल्टनबर्ग यांनी चीनविरोधात नाटो आघाडी निर्णायक ठरू शकते, याची जाणीव करून दिली.

यावेळी नाटोच्या प्रमुखांनी चीनला रोखण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्याची गरजही व्यक्त केली. नाटोने आता युरोपबाहेर पडून इतर क्षेत्रांमधील समविचारी भागीदार देशांबरोबर सहकार्य वाढवायला हवे, असे स्टॉल्टनबर्ग म्हणाले. भविष्यातील धोके ओळखून त्यांचा मुकाबला करण्यासाठी आखलेल्या ‘नाटो २०३० इनिशिएटिव्ह’ची माहिती देताना त्यांनी त्यात चीनचाही उल्लेख केला. जगात संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, याकडे लक्ष वेधून नाटोने चीन संदर्भात ठोस दृष्टीकोन ठेवायला हवा, असेही स्टॉल्टनबर्ग म्हणाले.

नाटोचा विस्तार

दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या नाटो या लष्करी संघटनेत अमेरिका, कॅनडा, तुर्कीव्यतिरिक्त २७ युरोपिय देशांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने नाटोतील इतर सदस्य देशांना संरक्षणखर्चाच्या मुद्यावरून धारेवर धरतानाच त्याच्या विस्ताराचाही प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांचा समावेश असलेल्या नाटोचेही संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आता नाटो प्रमुखांनी चीनचा उल्लेख करून विस्ताराबाबत उल्लेख करणे लक्ष वेधणारे ठरते.

अमेरिकेने गेल्या काही महिन्यात चीनविरोधात संघर्षाची धार अधिक तीव्र केली असून, जागतिक स्तरावर व्यापक आघाडी उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. नाटोने त्यात सक्रिय भूमिका घेतल्यास अनेरिकेची चीनविरोधी आघाडी अधिक मजबूत होईल, असे मानले जाते.

leave a reply