‘आयएनएस वागीर’चा नौदलात समावेश

मुंबई – मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये कलवरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी ‘आयएनएस वागीर’चा नौदलात समावेश झाला. सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात नौदलप्रमुख आर. हरि कुमार यांनी ‘वागीर’ला नौदलात सहभागी करून घेतले. ‘आयएनएस वागीर’च्या समावेशामुळे नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत नौदलात सहभागी झालेली ही तिसरी पाणबुडी ठरते. ही सर्वसाधारण कामगिरी ठरत नाही, तर भारतातील जहाजबांधणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याचा दाखला यातून मिळत असल्याचा दावा नौदलप्रमुखांनी केला आहे.

INS Wagirमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने (एमडीएल) फ्रान्सच्या सहाय्याने आयएनएस वागीरची निर्मिती केली. गोपनीय माहिती मिळवण्याबरोबर गस्त व टेहळणी करण्यासाठी ही पाणबुडी अत्यंत महत्त्वाची ठरेल.तसेच युद्धाच्या काळात निर्णायक हल्ले चढविण्याची विशेष क्षमता ‘आयएनएस वागीर’कडे आहे, असा दावा नौदलप्रमुखांनी यावेळी केला. या पाणबुडीवर तैनात असलेली घातक शस्त्रास्त्रे व अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे ही पाणबुडी नौदलाची क्षमता अधिकच वाढविणारी ठरेल, असे ॲडमिरल आर. हरि कुमार पुढे म्हणाले. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत नौदलात सहभागी झालेली वागीर ही तिसरी पाणबुडी असल्याची बाब देखील यावेळी नौदलप्रमुखांनी लक्षात आणून दिली. पाणबुड्यांच्या निर्मितीला मिळालेली ही चालना म्हणजे सर्वसाधारण बाब ठरत नाही. या आघाडीवर देशाने साधलेल्या प्रगतीचे हे उत्तम उदाहरण ठरते, असा दावा नौदलप्रमुखांनी केला आहे.

तर ‘एमडीएल’चे अध्यक्ष नारायण प्रसाद यांनी ‘आयएनएस वागीर’ने अवघ्या ११ महिन्यात आपल्या सागरी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती यावेळी दिली. ‘मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण असलेली ही पाणबुडी सागरी क्षेत्रातील देशाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी अतिशय प्रभावी कामगिरी करील, असा दावा प्रसाद यांनी केला. तसेच अतिशय संवेदनशील काळात भारताच्या नौदलात या पाणबुडीचा समावेश होत असल्याचे सांगून प्रसाद यांनी त्याचे स्वागत केले आहे.

स्पष्टपणे उल्लेख केलेला नसला, तरी भारताचा नैसर्गिक प्रभाव असलेल्या सागरी क्षेत्रात चीनच्या नौदलाचा वावर ही भारतासाठी चिंतेची बाब ठरते. या क्षेत्रातील भारताच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी चीनचे नौदल करीत असलेली धडपड लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत भारताच्या नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधिकाधिक प्रमाणात वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत ‘आयएनएस वागीर’च्या नौदलातील सहभागाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. नौदलप्रमुख आर. हरि कुमार व एमएलडीचे प्रमुख नारायण प्रसाद यांनी केलेली विधाने हीच बाब अधोरेखित करीत आहेत.

leave a reply