तुर्कीची नाटोतून हकालपट्टी होऊ शकते

नाटोच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

james stavridisवॉशिंग्टन – स्वीडन-फिनलँड अथवा तुर्की यापैकी कुणा एकाची निवड करायची वेळ अद्याप नाटोवर ओढावलेली नाही. पण तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्या स्वीडन-फिनलँडबाबतच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असेल. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी स्वीडन-फिनलँडचा नाटोतील प्रवेश रोखून धरला, तर नाटोतून तुर्कीच्या हकालपट्टीवरही विचार करता येईल, असा इशारा नाटोचे माजी वरिष्ठ कमांडर जेम्स स्टॅव्रिडीस यांनी दिला आहे.

गेल्या सात दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच नाटो महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे, असे ॲडमिरल जेम्स स्टॅव्रिडीस यांनी अमेरिकन वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना स्वीडन-फिनलँड हे नॉर्डिक देश नाटोमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत. तुर्की वगळता नाटोचे इतर सदस्य देश यासाठी अनुकूल आहेत. तुर्कीने देखील एकतर्फी विरोध वगळून स्वीडन-फिनलँडच्या नाटोतील प्रवेशाला पूर्ण पाठिंबा द्यावा. कारण तुर्कीचा हा विरोध रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांसाठी सहाय्यक ठरत असल्याचा ठपका नाटोचे माजी कमांडर स्टॅव्रिडीस यांनी ठेवला.

Illustration shows NATO, Turkish, Swedish and Finnish flagsसोव्हिएत रशियाच्या विघटनाआधी व नंतरही तुर्कीने नाटोसाठी फार मोठी भूमिका बजावली आहे, याकडे नाटोचे सदस्य देश दुर्लक्ष करू शकत नाही, याची आठवण स्टॅव्रिडीस यांनी करुन दिली. अफगाणिस्तानातील नाटोच्या मोहिमेला तुर्कीने आपले जवान, विमाने आणि विनाशिका देखील पुरविल्या. लिबियातील मुअम्मर गद्दाफीच्या विरोधातील कारवाईतही तुर्कीने अमेरिका व नाटोला सहाय्य केले, याचा उल्लेख स्टॅव्रिडीस यांनी केला. तुर्की हा नाटोचा महत्त्वाचा सहकारी देश असून तुर्कीतील इंसर्लिक हवाईतळ आणि इझमीर तळ नाटोसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

पण तुर्कीने काहीवेळा स्वीकारलेल्या भूमिका नाटोविरोधी असल्याचे स्टॅव्रिडीस यांनी ठणकावले. स्वीडन-फिनलँडविरोधात तुर्कीची भूमिका कुर्दद्वेषाने प्रेरित असल्याची टीका नाटोच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. तुर्कीने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या कुर्दांना स्वीडन-फिनलँडने आश्रय दिला आहे. तुर्कीच्या मागणीनंतरही स्वीडन-फिनलँड आपल्या देशातील कुर्दांचे हस्तांतरण करण्याच्या तयारीत नाहीत, यामुळे तुर्की संतापलेला आहे. हा वाद विरोधाने नाही तर चर्चेने सोडविण्याची गरज आहे. पण तुर्कीला अशा चर्चेची आवश्यकता वाटत नाही, याकडे स्टॅव्रिडीस यांनी लक्ष वेधले.

साब ग्रिपेनसारख्या पाचव्या श्रेणीतील लढाऊ विमानांची निर्मिती करणारा स्वीडन आणि अगदी कमी वेळेत रशियाच्या सीमेजवळ लष्कर तैनातीची क्षमता असलेला फिनलँड यांना नाटोत प्रवेश देणे आवश्यक बनले आहे. नाटोचे इतर सदस्य देश यासाठी अनुकूल आहेत. सध्या तरी नाटोवर स्वीडन-फिनलँड अथवा तुर्की यापैकी कुणा एकाची निवड करायची वेळ ओढावलेली नाही. पण राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी स्वीडन-फिनलँडच्या प्रवेशाविरोधातील आपली भूमिका कायम ठेवली तर लवकरच नाटोचे काही देश देखील पर्यायांवर विचार करू लागतील. कदाचित तुर्कीची नाटोतून हकालपट्टी करण्यावरही विचार होऊ शकेल, असे स्टॅव्रिडीस यांनी बजावले.

२००९ साली ॲडमिरल स्टॅव्रिडीस यांच्याकडे नाटोचे सर्वोच्च लष्करी नेतृत्व सोपविण्यात आले होते. ॲडमिरल स्टॅव्रिडीस यांच्याच नेतृत्वाखाली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तान तसेच लिबियातील कारवाया पार पाडल्या होत्या. स्टॅव्रिडीस हे ओबामा प्रशासनाचे विश्वसनीय होते, असा दावा केला जातो. त्यामुळे स्टॅव्रिडीस यांच्याद्वारे अमेरिकेनेच तुर्कीला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply