इराक व अफगाणिस्ताननंतर अमेरिका सोमालियातूनही सैन्य माघारी घेणार

वॉशिंग्टन/मोगादिशु – इराक व अफगाणिस्तानपाठोपाठ अमेरिकेने सोमालियातील आपल्या लष्करी तैनातीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमालियात सध्या अमेरिकेचे सुमारे 700 जवान तैनात असून त्यातील बहुतांश जवानांना माघारी बोलाविण्यात येईल किंवा आफ्रिकेतील इतर भागात तैनात केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या आदेशावर अमेरिकेतील राजकीय तसेच लष्करी वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे. एका वरिष्ठ संसद सदस्याने सोमालियातील लष्करी माघारी म्हणजे अल कायदासमोर स्वीकारलेली शरणागती व चीनला दिलेली भेट आहे, असे टीकास्त्र सोडले आहे.

शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमालियातील बहुतांश जवान 15 जानेवारी 2021पर्यंत माघारी बोलवावेत असे आदेश दिले आहेत. ‘काही जवान पूर्व आफ्रिकेव्यतिरिक्त इतर आफ्रिकी देशांमध्ये तैनात करण्यात येतील. यापुढेही अमेरिकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या आफ्रिकेतील कट्टरपंथी व दहशतवादी संघटनांविरोधातील लढाई चालू राहिल. जागतिक सत्तास्पर्धेत अमेरिकेचे सामरिक वर्चस्व कायम राखण्याचीही खबरदारी घेण्यात येत आहे’, अशा शब्दात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सोमालियातील माघारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2016 साली झालेल्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे परदेशात तैनात असलेले सैनिक मोठ्या प्रमाणात माघारी बोलाविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर 2018 साली अमेरिकेचे तत्कालिन संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी, चीन व रशियाकडून अमेरिकेच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याचा मुद्दा समोर आणून आफ्रिकेतील सैन्यकपातीबाबत संकेत दिले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षात अमेरिकेने आपले जवान माघारी बोलविण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत सिरिया, इराक, अफगाणिस्तान, फिलिपाईन्स तसेच जर्मनीतून लष्करी तैनातीत कपात करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी सिरिया, इराक व अफगाणिस्तानातून काही सैन्य माघारी आल्याचे सांगण्यात येते.

आफ्रिकेतील लिबिया, सोमालिया, जिबौती, ट्युनिशिआ, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, नायजर, डिआर काँगो, केनिया, कॅमरून, माली या देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. या देशांमधील तळांवर अमेरिकेचे सात हजारांहून अधिक जवान तैनात आहेत. जिबौतीमध्ये अमेरिकेचा या खंडातील सर्वात मोठा संरक्षणतळ आहे. तर गेल्या वर्षी अमेरिकेने पूर्व आफ्रिकेतील नायजरमध्ये ‘एअरबेस 201’ नावाने नवा हवाईतळ कार्यरत केला होता. या तळावर 600 जवान तैनात करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या काही वर्षात चीन, रशिया व तुर्कीने आफ्रिकेतील आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. चीनने जिबौतीमध्ये आपला पहिला परदेशातील संरक्षणतळ सक्रिय केला असून अजून तीन आफ्रिकी देशांमध्ये तळ उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. रशियाने सुदान, दक्षिण आफ्रिका, अल्जिरिया, रवांडा, नायजेरिया व सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांशी संरक्षण सहकार्य वाढविले आहे. येत्या काही महिन्यात सुदानमध्ये रशियाचा नौदल तळ सुरू होणार असल्याचेही समोर आले आहे. तर तुर्कीने सोमालियातील हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढविल्याची माहितीही माध्यमांमधून समोर आली आहे.
या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने सोमालियासारख्या सामरिकदृष्टया महत्त्वाच्या देशातून सुरू केलेली माघारीची तयारी लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

leave a reply